ग्रामपंचायतची रणधुमाळी राजकीय आखाड्यात गांवगड्याची दंगल...

file photo
file photo

ब्रह्मपुरी (सोलापूर): मंगळवेढा तालुक्‍यातील फेब्रुवारी अखेर ३९ ग्रामपंचायतीं पैकी २३ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. निवडणूक होत असलेल्या गावांबरोबर तालुक्‍याच्या राजकीय वातावरण तापले असून, आखाड्यातील गांवगड्याच्या हालचाली गतिमान झाल्यासारखे दिसत आहे. ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांना कस लागणार आहे.

तालुक्‍यातील निवडणूक होत असलेल्या बहुतांशी ग्रामपंचायतीवर आमदार भारत भालके, तर काही ग्रामपंचायतीवर दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या गटाची सत्ता आहे. ग्रामीण भागातील सत्ता स्थानावरच विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे ग्रामपंचायतींची सत्ता अबाधित राखण्यासाठी आमदार भारत भालके, तर सत्ता मिळवण्यासाठी दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताड़े यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून एक गट काही ठिकाणी सक्रिय आहे. त्याचबरोबर  काँग्रेस व राष्ट्रवादी जिल्हा परिषद-पंचायत समितीप्रमाणे ग्रामपंचायतीतही आवताडे, परिचारक गटाविरुद्ध आघाडीचा पॅटर्न राबवला जाणार का? याबद्दल उत्सुकता आहे. जिल्हा परिषद पंचायत समिति निवडणुकीतील घवघवित यशानंतर अवताड़े गटाचा वारू रोखनार का? यामुळे या निवडणुका चुरशीची होईल, येणारा काळच ठरवेल.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावोगावी आपल्या गटाची सत्ता आणण्यासाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भालके, आवताडे आणि परिचारक गटाच्या खंदे समर्थकांत चढाओढ सुरू असून, पडद्यामागील हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गावपातळीवरील सत्ताधारी, विरोधकांच्या गटांच्या बैठकांना सुरवात झाली आहे. प्रत्येक प्रभागानुसार मतदाराची नावे, मोबाइल नंबर, वाडयावस्तीवर शोध घेऊन एसएमएस, व्हाटस्अप, फेसबुक माध्यमाद्वारे शोध घेऊन गाव, प्रभागनिहाय राजकीय स्थितीचा अंदाज घेत संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. गटाच्या वर्चस्वासाठी भालके, आवताडे अशा गटातील कार्यकर्त्यांत चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

यंदा प्रथमच सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत कमालीची उत्सुकता आहे. सरपंचपदाचा उमेदवार ठरवताना नेत्यांचा कस लागणार आहे, असे सध्या तरी चित्र आहे. थेट सरपंचपदामुळे आतापासूनच निवडणुकीत रंग भरण्यास सुरवात झाली आहे. दोन्ही गटांकडे अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवार निश्‍चित करताना नेत्याबरोबर गावनेत्यांची कसोटी आहे. उमेदवारीवरून बंडखोरी होऊ नये, यासाठी सरपंचपदाचा उमेदवार हा संबंधित गटातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ठरवावा लागणार आहे. उमेदवाराचे स्वतःचे राजकीय वलय, प्रभाव, स्थानिक पातळीवरील गटा-तटाचे, भावकीचे राजकारण यावरच उमेदवारीचे भवितव्य असणार आहे.

‘मिशन - २०१९’
मंगलवेढा तालुक्‍यात एकूण ७९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी फेब्रुवारी अखेर ३९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. आगामी २०१९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तयारीचा भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या राजकीय आखाड्यात भालके, आवताडे आणि परिचारक हे तिन्ही गट आपापली ताकद अजमावणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे तिन्ही गटांसाठी राजकीय वर्चस्वाची लढाई आणि विधानसभेची रंगीत तालीम असेल, असे चित्र दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com