मुरूमाऐवजी वापरली माती; लघुसिंचन विभागाचा कारभार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सोलापूर - जिल्ह्यात लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्यावतीने सिमेंट नाला बंधारे उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी त्या बंधाऱ्यावर पूल उभारावे लागले आहेत. ते पूल अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहेत. पुलावर मुरूम टाकण्याऐवजी चक्क मातीचा वापर केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या विभागाने केलेल्या कामाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात मागील वर्षी व यंदाही जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रभावीपणे राबविण्यावर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोर दिला होता. त्यामुळे सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंडिंग यासारख्या कामावर जोर दिला होता. जलयुक्त शिवारमधून ओढ्यावर मोठ्या प्रमाणात सिमेंट नाला बांध उभारण्यात आले आहेत. त्या बंधाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. काही ठिकाणी या बंधाऱ्याच्या पुढे शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी पूल उभारण्यात आले आहेत. मात्र, या पुलाची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत.

पूल उभारणीसाठी सिमेंट कॉंक्रिट व वाळूचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, त्या पुलामध्ये मोठ्या प्रमाणात दगडांचा वापर केला असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर मातीमिश्रित वाळूचा उपयोग केला आहे. त्यामुळे अनेक पूल निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. याकडे लघुसिंचन विभागाने पूर्णपणे काणाडोळा केल्याचे दिसून येते. पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथे उभारण्यात आलेल्या पुलाचेही काम निकृष्ट आहे. त्या पुलावर मुरुमाऐवजी मातीचा वापर केला आहे. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर माती टाकण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून त्या कामाचे फोटो माझ्याकडे आले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- मुकुंद इंगळे, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण)

Web Title: solapur news marathi news maharashtra news small irrigation