महावितरणकडे मीटरचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

अर्ज करूनही मीटर येत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी

अर्ज करूनही मीटर येत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी
सोलापूर - जिल्ह्यात महावितरणच्या वतीने घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. शेतीपंपाला विजेचे मीटर बसविण्याकडे महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. शेतकरी विजेचे बिल भरत नसल्याचे कारण त्यासाठी महावितरणकडून सांगितले जाते. मात्र, घरगुती ग्राहकांनाही नादुरुस्त झालेले मीटर बदलून देण्याकडे महावितरण पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

महावितरणकडून घरगुती ग्राहकांना विजेचा वापर किती झाला याच्या माहिती व्हावी यासाठी मीटर दिले आहेत. अनेक वेळा मीटर नादुरुस्त होतात. ते बदलून देण्यासाठी महावितरणकडे अर्ज करूनही ग्राहकांना मीटर बदलून दिले जात नाहीत. त्यामुळे दरमहा ग्राहकांना अंदाजे रीडिंग टाकून दिलेले बिल भरण्याशिवाय पर्याय राहात नाही. अनेक वेळा अंदाजे रीडिंग टाकण्याच्या नादात कधी रीडिंग जास्त होते; तर कधी रीडिंग कमी होते. या सगळ्या प्रकाराचा फटका वीजग्राहकांना विनाकारण सहन करावा लागतो. महावितरणकडून वीज मीटरचे रीडिंग घेण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, अनेक ग्राहकांची नादुरुस्त झालेली मीटर बदलूनच दिली जात नसतील तर करायचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी असेच चित्र असल्याचे दिसून येते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली असता, मीटर उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मीटर येण्यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशी उत्तरे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. यावरून महावितरणकडे मीटरचा तुटवडा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

Web Title: solapur news meter shortage to mahavitaran