दूध दरासाठी 70ः30 चा फॉर्म्युला? 

संतोष सिरसट
शनिवार, 6 जानेवारी 2018

सोलापूर - राज्यातील सहकारी दूध संघांच्या सध्याच्या दूध दरासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. त्या अहवालामध्ये दूध दरासाठी उसाप्रमाणे 70ः30 चा फॉर्म्युला सुचविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सोलापूर - राज्यातील सहकारी दूध संघांच्या सध्याच्या दूध दरासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. त्या अहवालामध्ये दूध दरासाठी उसाप्रमाणे 70ः30 चा फॉर्म्युला सुचविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शासनाने 21 जूनपासून 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ या गुणप्रतीच्या गायीच्या दुधासाठी 27 रुपये प्रतिलिटर इतका दर जाहीर केला होता. सुरवातीच्या काळात हा दर देण्याबाबत सहकारी दूध संघांनी तयारी दर्शविली. मात्र, बाजारात दुधाचे उत्पादन वाढले व दूध भुकटीचे दर कमी झाल्यामुळे दूध संघांना 27 रुपये प्रतिलिटर दर देणे तोट्याचे होऊ लागले होते. त्यामुळे राज्यातील अनेक संघांनी 27 रुपयांनी दूधखरेदी बंद केली. त्यामुळे शासनाच्या वतीने अशा दूध संघांवर कारवाई सुरू केली होती. ही कारवाई अयोग्य असल्याचे सांगत राज्य सहकारी संघाने एक डिसेंबरपासून दूध संकलन बंद करण्याचा इशारा दिला होता. त्या वेळी राज्य शासनाने दूध दराच्या अडचणीबाबत उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्य विभागाचे सचिव विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यानंतर सहकारी संघाने दूध बंद आंदोलन मागे घेतले होते. या समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला आहे. त्यामध्ये ऊस दराप्रमाणे दूध विक्रीपासून येणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी 70 टक्के उत्पन्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना, तर 30 टक्के उत्पन्न दूध संघ चालविणाऱ्यांना देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर दूध भुकटीच्या संदर्भातही काही उपाययोजना या समितीने सुचविल्या आहेत. 

हमीभावाचा विषय बाजूला? 
दूध दराबाबत 70ः30चा फॉर्म्युला वापरण्याच्या सूचना समितीने राज्य सरकारला केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास दूध दर शासन ठरवणार नाही. दूध संकलन करणाऱ्या संघानेच 70ः30 प्रमाणे दर शेतकऱ्यांना देणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे दुधाला हमीभाव हा विषय बाजूला पडणार का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

समितीने आपला अहवाल शासनास सादर केला असून, त्यामध्ये काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याबाबत शासन योग्य तो निर्णय घेईल. 
- आर. आर. जाधव, आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास 

Web Title: solapur news milk rate