'बसप'चा नेता असल्याचे सांगून पोलिसांना केली दमदाटी व शिवीगाळ

राजकुमार शहा
बुधवार, 10 जानेवारी 2018

मोहोळ (सोलापूर): खंडणी व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या चार संशययितांनी त्यांच्याच शोधात निघालेल्या पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षकास बहुजन समाज पार्टीचा नेता असल्याचे सांगत दमदाटी व शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ (सोलापूर): खंडणी व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या चार संशययितांनी त्यांच्याच शोधात निघालेल्या पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षकास बहुजन समाज पार्टीचा नेता असल्याचे सांगत दमदाटी व शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर मधुकर ससाणे, अविनाश मधुकर ससाणे, हरी अप्पा क्षीरसागर (रा. सिध्दार्थ नगर, मोहोळ), किशोर गोविंद देवांग (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ९ ) दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहरातील बागवान चौक येथे राहत असलेल्या इम्रान गुलाब बागवान याच्या घरी वरील चौघाजण कार (क्रमांक एम. एच. ३९.४२११ ) मधून गेले व मागील केस काढून घे आणि १० हजार रुपये हप्ता दे असे म्हणून मारहाण करून गळ्यातील २५ हजार रुपयांचे सोन्याचे लॉकेट काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या तक्रारीच्या अनुशंगाने या घटनेतील संशयित कुरुल रोड वरील एका हॉटेल जवळ उभे असल्याचे समजल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड तेथे गेले. त्या ठिकाणी संबंधित क्रमांकाची गाडी उभी असल्याचे दिसून आले. त्या वेळी पोलिस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड यांनी आपण पोलिस असल्याचे सांगत गाडीतील लोकांची चौकशी करत त्यांना नाव व पत्ते विचारले. यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पुन्हा नाव व पत्ता विचारला असता त्यातील एकाने मी बहुजन समाज पार्टीचा नेता असल्याचे सांगून मी काहीही करेल तुम्ही कोण विचारणार, एकेकाला बघून घेईन, माझी वरपर्यंत पोहच आहे, असे म्हणून पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस पथकातील कर्मचार्यांना दमदाटी करून शिवीगाळ करू लागले.

पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणले असता चौकशी दरम्यान पुन्हा शीवीगाळ करून पोलिस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड यांना छातीवर धक्का मारून दमदाटी केली व इतर कर्मचाऱ्यांनाही दमदाटी केली. या प्रकरणी चौघां विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड करीत आहेत.

Web Title: solapur news Mohall police station has filed a complaint against the four