वैदू वस्तीमध्ये अवतरले श्री विठ्ठल-रुक्‍मिणी

विजयकुमार सोनवणे
रविवार, 2 जुलै 2017

सोलापूर - सकाळी उठायचं..आहे त्याच स्थितीत शाळेत जायचं..मधल्या सुटीत घरी येऊन आहे ते शिळंपाकं खायचं..अन्‌ पुन्हा शाळेत जायचं.. असा दिनक्रम असलेल्या वैदू वस्तीतील लहानग्यांनी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचा साक्षात्कार वस्तीला घडविला आणि त्यांच्या पालकांनी डोळ्यांचे पारणे फिटेपर्यंत तो पाहिला. निमित्त होते, आषाढीनिमित्त महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीचे. 

रात्री उशिरापर्यंत काम करायचे आणि सकाळी पुन्हा कामाला जुंपायचे.. घरासमोर धुराडलेल्या चुली आणि ज्येष्ठांचे जोरजोरात बोलणे, काही वेळा छोट्या-मोठ्या तक्रारीही.. हे वस्तीतील दैनंदिन चित्र. शनिवारची सकाळ मात्र हा परिसर मृदंग, टाळ-चिपळ्यांच्या आवाजाने दुमदुमला. 

श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा जथा वस्तीतून निघाला, तेव्हा लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत आपापल्या घरातून बाहेर डोकावू लागले. पालकांना स्वप्नातही वाटले नव्हते, की आपली मुले साक्षात विठ्ठल-रुक्‍मिणी होतील, वारकरी होतील. मात्र ते घडले होते. मातीत लोळणारे लहानगे स्वच्छ कपड्यांमध्ये विठुनामाचा गरज करीत निघाले होते. हा अनुभव या परिसराला अगदी नवीनच होता. वारीचा आनंद सर्वांनी घेतला. अनेक पालकांनी आपापल्या मुला-मुलींच्या आणाभाका काढल्या. त्यांना दृष्ट लागू नये म्हणून घरातून मिरच्याही ओवाळून टाकल्या. १५ ते २० मिनिटे चाललेल्या या दिंडीने वैदू वस्तीतील नागरिकांची शनिवारची सकाळ भक्तिमय बनवली. मुख्याध्यापक अप्पासाहेब ककमारे व सहशिक्षिका गंगा शिंदे यांनी या दिंडीचे नियोजन केले.

..अन्‌ ‘विठ्ठला’ला रडू कोसळले
अंगावर भरजरी कपडे घालण्याचा पहिलाच अनुभव या लहानग्यांना होता. त्यामुळे विठ्ठलाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्याला ते झेपले नाही. त्यामुळे त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रुक्‍मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थिनीने मात्र त्याकडे थोडेही पाहिले नाही, ती आपल्या मस्त ‘पोझ’मध्ये उभी होती.

Web Title: solapur news municipal school