रे प्रकल्पाला मंत्र्याचा विरोध; मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा - नरसय्या आडम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली सर्वांसाठी घरे ही योजना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता पूर्ण करीत असताना, भाजपच्याच सोलापुरातील एका मंत्र्याने हा प्रकल्प बोगस असल्याची तक्रार केली; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या एकसदस्यीय समितीने तपासणी केली असता, "दूध का दूध आणि पानी का पानी' झाले, असा टोला माजी आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी लगावला.

रे योजनेसंदर्भात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, 'ही योजना बोगस असल्याची तक्रार एका मंत्र्याने केंद्रीय नगरविकासमंत्री व विद्यमान उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्याकडे केली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र रे, प्रकल्प चांगला असून, त्यामुळे असंघटित कामगार आणि मध्यमवर्गीय लोकांना घरे मिळतील, त्यामुळे हा प्रकल्प मंजूर करावा, अशी विनंती नायडू यांना केली. तथापि, नायडू यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी केली आणि प्रकल्प योग्य असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे नायडू यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली.

सहकारमंत्री सुभाष देशमुख सध्या दक्षिण सोलापूरचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट मतदारसंघातही मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार उभे केले जातील. उमेदवार कोण असेल, हे त्या वेळी स्पष्ट केले जाईल, असेही आडम यांनी या वेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news narsayya adam talking