आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हवीय सायबर साक्षरता !

परशुराम कोकणे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सहज मिळणाऱ्या पैशांसाठी सायबर क्राईम करणाऱ्यांची संख्या वाढतेय. एखाद्या चुकीमुळे आपले मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे आता प्रत्येकाला सायबर साक्षर होण्याची गरज आहे. 

सोलापूर - डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ई-पेमेंट, ई-मेल, सोशल मीडियासह विविध ऑनलाइन माध्यमांमुळे आपले रोजचे जगणे बऱ्यापैकी डिजिटल झाले आहे. हातातल्या स्मार्टफोनमुळे मोठ्यांसह लहान मुलेही ऑनलाइन विश्‍वात वावरत असतात. या माध्यमातून अनेक कामे सोपी झाली असली तरी धोकेही तेवढेच वाढले आहेत. सहज मिळणाऱ्या पैशांसाठी सायबर क्राईम करणाऱ्यांची संख्या वाढतेय. एखाद्या चुकीमुळे आपले मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे आता प्रत्येकाला सायबर साक्षर होण्याची गरज आहे. 

स्मार्टफोनमुळे प्रत्येकजण डिजिटल माध्यमाशी जोडला गेला आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार असो वा सोशल मीडियाचा वापर मोठ्यांसह लहान मुलेही डिजिटल विश्‍वाच्या संपर्कात आहेत. हे माध्यम नेमके कसे वापरायचे, त्यात कोणते धोके आहेत, एखादी चूक झाली तर काय करायचे, याची माहिती बहुतांश लोकांना नाही. सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वसामान्य लोक अडकतातच, यात वकील, डॉक्‍टर, व्यावसायिक, उद्योजक या क्षेत्रातील उच्चशिक्षित मंडळींचे प्रमाण अधिक असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. 

शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये सायबर सुरक्षेचा समावेश व्हायला हवा. डिजिटल माध्यम नेमके कसे वापरायचे किंवा एखादी चूक आपल्याकडून झाली तर काय करायचे, याची माहिती नसते. अनेकजण तर दुसऱ्याचे पाहून डिजिटल माध्यम वापरायला सुरवात करतात. सायबर कायद्यांचीही माहिती विद्यार्थ्यांना द्यायला हवी. त्याशिवाय सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे अवघड आहे. 
- डॉ. हनुमंत जगताप, 

शिक्षणतज्ज्ञ 

डिजिटल तंत्रज्ञानाशी आपला संबंध 

 • संदेशवहन (व्हॉट्‌सऍप, ई-मेल, सोशल नेटवर्किंग साइट) 
 • चालू घडामोडी 
 • शिक्षण 
 • ऑनलाइन व्यवहार 
 • मनोरंजन 

सायबर सुरक्षेची गरज 

 • वैयक्तिक व संवेदनशील डिजिटल माहितीच्या सुरक्षेकरिता. 
 • आर्थिक नुकसान टाळण्याकरिता. 
 • ऑनलाइन समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर करण्याकरिता. 

हे आहेत सायबर गुन्ह्यांचे प्रकार 

 • फिशिंग 
 • हॅकिंग 
 • नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक 
 • विवाहविषयक फसवणूक 
 • वैयक्तिक माहितीची चोरी 
 • बॅंकविषयक फसवणूक 
 • एटीएम फसवणूक 
 • सोशल मीडियाद्वारे बदनामी 
 • विमाविषयक फसवणूक 
 • ऑनलाइन खरेदीविषयक फसवणूक
Web Title: Solapur News need of Cyber literacy