ऑनलाइन खरेदीत धोके वाढले

परशुराम कोकणे
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सोलापूर - ऑनलाइन शॉपिंगने मागविल्या जाणाऱ्या अनेक वस्तू खरंच स्वस्त आणि मस्त असतात. मार्केटच्या तुलनेत काही वस्तू वेगळ्या आणि बजेटमध्येही मिळतात, पण ऑनलाइन शॉपिंग म्हणजे लागला तर नेम नाही तर गेम अशीच काहीशी स्थिती आहे. स्मार्टफोनमुळे ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ वाढत आहे. नव्यासह जुन्या वस्तू स्वस्तात खरेदी करण्यासाठीही अनेक जण धडपडत असतात. साइटवर दाखविलेली वस्तू पुन्हा मिळणार नाही या विचाराने अनेक जण तत्काळ पेटीएम किंवा ऑनलाइन ट्रान्स्फर करून पैसे पाठवितात. साइटवर दाखविलेली वस्तू प्रत्यक्षात घरी आल्यानंतर वेगळीच असते. काही घटनांमध्ये तर ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर वस्तू पाठविण्यास टाळाटाळ करून गंडविले जात आहे.

कुत्र्यांची पिल्ले दाखवून गंडविले
जुन्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करणाऱ्या साइटवर एका व्यक्तीने कुत्र्याची दोन पिले विकायचे असल्याचे सांगून फोटो आणि माहिती शेअर केली होती. कुत्र्याच्या एका पिलाची किंमत 18 हजार रुपये सांगण्यात आली होती. कुत्र्याची दोन पिले घेण्यास उत्सुक असलेल्या सोलापूरच्या तरुणाने 30 हजारांत व्यवहार ठरविला. साइटवर दिलेल्या बॅंक खात्यावर पैसे पाठविले. त्यानंतर टाळाटाळ सुरू झाली. मी फक्‍त एजंट आहे, मालकाकडून कुत्र्याची पिले आणताना ती मेली असे म्हणून संपर्क बंद केला.

दक्षतेने टळली फसवणूक!
सोलापुरातील छायाचित्रकार संतोष वाघमारे यांनी ओएलएक्‍स साइटवर ड्रोन कॅमेऱ्याची जाहिरात पाहिली. संतोष यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला. दिल्लीतून बोलतोय असे सांगणाऱ्या समोरील व्यक्तीने फोनवर अधिक बोलणे टाळून व्हॉट्‌सऍपवर चॅटद्वारे माहिती दिली. पाच लाखांची वस्तू एक लाखाला देतो असे सांगण्यात आले. पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी बॅंकेचा आयएफएससी कोड पाठविला. संतोष यांना शंका आल्याने त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली. पोलिसांनी आयएफएससी कोड गुगलवर सर्च करून पाहिला. तो कोड मिझोरममधील बॅंकेचा असल्याचे समजले. यात फसवणुकीची शक्‍यता असल्याने संतोष यांनी व्यवहार करणे टाळले.

व्यवहाराआधी हे करा..
- ऑनलाइन खरेदीपूर्वी संकेतस्थळाची पडताळणी करावी.
- फोटोंवर विश्‍वास न ठेवता चाचपणी करावी
- सुरक्षित संकेतस्थळांचाच वापर करा.
- कॅश ऑन डीलिव्हरीचा पर्याय निवडा.

ऑनलाइन शॉपिंग विचारपूर्वक करावी. कॅश ऑन डीलिव्हरीचा पर्याय निवडावा. वस्तू चांगली नसेल तर ती खरेदी करू नये. फसवणूक झाल्यास सायबर पोलिसात तक्रार करा.
- अमोल कानडे, शहर सायबर पोलिस ठाणे

Web Title: solapur news online purchasing danger