पंढरपूर: गर्भपात करताना पोलिसांनी पकडले

अभय जोशी
बुधवार, 28 जून 2017

दरम्यान बोगस डॉक्‍टर तसेच अशा पध्दतीने गर्भपात करणाऱ्या अन्य कोणी व्यक्ती असल्यास त्यांच्या विषयी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा आपल्याला माहिती कळवावी. संबंधितांच्या विरुध्द तत्काळ कारवाई केली जाईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी सांगितले. 

पंढरपूर - तालुक्‍यातील लक्ष्मी टाकळी येथील एका घरात बेकायदेशीररित्या गर्भपात करत असताना पोलिसांनी छापा टाकून एका महिलेस ताब्यात घेतले. कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसलेली आरोपी महिला प्रसुतीगृहातील काही वर्षाच्या अनुभवानंतर हा बेकायदेशीर व्यवसाय करत होती. गर्भपात करण्यात आलेली महिला अंबाजोगाई तालुक्‍यातील आहे. तिला उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यात आले आहे. 

या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, 26 जून रोजी दुपारी तालुक्‍यातील लक्ष्मी टाकळी परिसरातील एका घरात आरोपी सुनीता विठ्ठल गायकवाड (वय 38 रा. श्री नगरी, कोर्टी रोड) एका महिलेचा गर्भपात करत असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाली. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गालिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यांनी तातडीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांना कळवले. त्यांनी गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर सुभाष मंगेडकर (वय 32, रा.शांकुतलनगर, पंढरपूर) यांना घटनास्थळी तत्काळ जाण्याच्या सूचना दिल्या. 

पोलिसांना घटनास्थळी एका खोलीतील बेडवर एका महिलेचा गर्भपात सुरु असल्याचे दिसले. त्यासाठी आवश्‍यक असलेली उपकरणे व औषधे ही पोलिसांना तिथे सापडली. त्यानंतर 27 जून रोजी आरोपी सुनीता गायकवाड या महिलेच्या विरोधात डॉ. सागर सुभाष मंगेडकर (वय 32, रा. शांकुतलनगर, पंढरपूर) यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीस सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

आरोपीने कोणतेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही. इयत्ता दहावी सुध्दा आरोपी पास झालेली नाही. आरोपी महिला यापूर्वी काही प्रसुतीगहामध्ये नोकरीस होती. तेथील अनुभवाच्या आधाराने आरोपीने हा बेकायदेशीर व्यवसाय सुरु केला असावा असा पोलिसांना संशय आहे. ज्या महिलेचा गर्भपात करण्यात आला. तिची गर्भलिंग तपासणी करण्यात आली होती व स्त्री जातीचा गर्भ असल्याने महिला व तिच्या सासरच्या लोकांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती पुढे येत आहे. आरोपी किती दिवसांपासून हा बेकायदेशीर उद्योग करत होती. गर्भपात करण्यापूर्वी कुणाकडे गर्भलिंग तपासणी केली जात होती याचा तपास पोलिस करत आहेत. 

दरम्यान बोगस डॉक्‍टर तसेच अशा पध्दतीने गर्भपात करणाऱ्या अन्य कोणी व्यक्ती असल्यास त्यांच्या विषयी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा आपल्याला माहिती कळवावी. संबंधितांच्या विरुध्द तत्काळ कारवाई केली जाईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी सांगितले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
मीरा कुमार यांनी दाखल केला अर्ज
1 जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच : खासदार संभाजीराजे
फेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या 200 कोटींवर!​
मुंबई: प्रकृती अस्वस्थामुळे मुस्तफा डोसा रुग्णालयात​
पुणे: आंद्रा धरणग्रस्तांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा
प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीचादेखील अर्ज​
रॅन्समवेअरचा पुन्हा हल्ला​
वसुली, पीककर्जाचा प्रश्‍न कायम
कर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री​

Web Title: Solapur news Pandharpur: Police arrested while abortion