नोंदणी न केल्यास पाच हजारांचा जागेवर दंड 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

आकडे बोलतात... 
प्लास्टिकच्या जप्त पिशव्या - 1842 किलो 
अंदाजे किंमत - 1.86 लाख रुपये 
नोटिसा बजावलेले व्यापारी - 37 
कारवाई झालेले व्यापारी - 31 
नोंदणी केलेले व्यापारी - 12 
जमा झालेले नोंदणी शुल्क - 2.40 लाख रुपये 

सोलापूर - पन्नास मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांनी नोंदणी न केल्यास त्यांना जागेवर पाच हजारांचा दंड केला जाणार आहे, अशी माहिती अन्न व परवाना अधीक्षक अनिरुद्ध आराध्ये यांनी दिली. 

शासनाने आदेश दिल्याप्रमाणे महापालिकेने प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र केली आहे. दुकानांची तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. रोज किमान पाच ते सहा दुकानांची अचानकपणे तपासणी केली जात आहे. बुधवारी चार दुकानदारांवर कारवाई करून 70 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. विशेष पथकामध्ये श्री. आराध्ये यांच्यासह निरीक्षक केदार गोटे, श्रीराम कुलकर्णी, दत्ता गायकवाड व महादेव शेरखाने यांचा समावेश आहे. शासनाने काढलेल्या नवीन आदेशानुसार आता थर्माकोल वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. 

नवीन कायद्यानुसार लॉंड्री, साडीविक्रेते, स्वीटमीट मार्ट, कापड व्यापारी, टेलर, बेकरी, दुकान, चादर शोरूम, इलेक्‍ट्रिक दुकान, सुपर मार्केटमधील व्यावसायिक, ज्यांनी आपल्या फर्मचे नाव पिशव्यांवर छापले आहे अशांनीही नोंदणी करणे आवश्‍यक आहे. ज्या व्यापाऱ्यांकडून या नियमाचे उल्लंघन होईल, त्यांच्याकडील प्लास्टिकचा साठा जप्त करण्यासह दंडही केला जाणार असल्याचा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे व उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिला आहे. 

Web Title: solapur news Plastic confiscation campaign