चोरीचा संशय असलेल्या सहायक फौजदाराची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

सहायक फौजदार राजमाने हे खोटे बोलत असल्याचा संशय पोलिसांना होता. ज्या रस्त्यावरून चोरट्यांनी राजमाने यांचा पाठलाग केल्याचे सांगितले, त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली, मात्र कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राजमाने किंवा चोरट्यांचे चित्रीकरण झाले नाही. दोन्ही बाजूने तपासण्याचे आदेश पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिले होते.

सोलापूर : पोलिस आयुक्तालयाच्या पेट्रोल पंपावरील पाच लाखांची रोकड चोरी केल्याचा संशय असलेल्या सहायक फौजदार मारुती राजमाने यांनी  आज (बुधवारी) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपाभवानी मंदीराजवळील पुलाच्या कठड्याला दोरीने गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. 

सहायक फौजदार मारुती लक्ष्मण राजमाने (वय 56, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे पूर्ण नाव आहे. रविवारी (ता.१८) रात्री सव्वा अकराच्या सुमारास पेट्रोल पंपावरील पाच लाखांची रोकड पोलिस मुख्यालयात ठेवण्यासाठी नेत असताना चोरट्यांनी रस्त्यात अडवून चाकुने वार करून पाच लाखांची रोकड असलेली बॅग पळवल्याची फिर्याद राजमाने यांनी दिली होती. याप्रकरणात राजमाने यांच्यावरच पोलिसांचा संशय होता. तपासादरम्यान त्यांच्या घरात एक लाख 80 हजारांची रोकड सापडली होती. त्या नोटांची पडताळणी करण्याचे काम चालू आहे. पोलिस अद्याप कोणत्याही निकर्षापर्यंत पोचले नाहीत, तपास चालू आहे. हे प्रकरण नेमके काय आहे हे बुधवारी दुपारपर्यंत कळेल असे पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी मंगळवारी रात्री सांगितले होते. 

राजमाने यांची शेती आहे तसेच मुलांचा व्यवसायही आहे. त्यामुळे घरात साडपलेली रक्कम स्वत:ची असल्याचे त्यांनी तपासात सांगितले होते. अद्याप पोलिस कोणत्याही निकर्षापर्यंत पोचले नाहीत. रविवारी पहाटे रुपाभवानी मंदिराच्या जवळील पुलाच्या कठड्याला राजमाने यांनी आत्महत्या केली. माहिती कळताच सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

सहायक फौजदार राजमाने हे खोटे बोलत असल्याचा संशय पोलिसांना होता. ज्या रस्त्यावरून चोरट्यांनी राजमाने यांचा पाठलाग केल्याचे सांगितले, त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली, मात्र कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राजमाने किंवा चोरट्यांचे चित्रीकरण झाले नाही. दोन्ही बाजूने तपासण्याचे आदेश पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिले होते.

Web Title: Solapur news poice suicide in robbery case