पोलिसांसाठी होणार ८०० घरांची वसाहत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

सोलापूर - शहर पोलिसांच्या निवासाकरिता ८०० घरांची नवी वसाहत उभारण्यात येणार आहे. पोलिस मुख्यालय आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या जागेत ही वसाहत होणार आहे.

सोलापूर - शहर पोलिसांच्या निवासाकरिता ८०० घरांची नवी वसाहत उभारण्यात येणार आहे. पोलिस मुख्यालय आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या जागेत ही वसाहत होणार आहे.

पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयात वसाहत उभी करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. ८०० घरांपैकी ६२० इमारती पोलिस मुख्यालयात तर १८० इमारती फौजदार चावडी पोलिस ठाण्यालगतच्या जागेत उभारण्यात येणार आहेत. पोलिस निवासस्थानाबरोबरच मोटार ट्रान्स्पोर्ट, कार्यशाळा, अत्याधुनिक जिमखाना, वाचनालय आदी सोयी येथे असतील. तसेच रुग्णालय, मल्टिपर्पज हॉल, इनडोअर जीम होणार आहे. त्याचबरोबर पोलिस मुख्यालयाला नव्याने संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे.

पोलिस निवासस्थानाबरोबरच तीन पोलिस उपायुक्त निवासस्थाने, सहा सहायक पोलिस आयुक्त निवासस्थाने होणार आहेत. हा प्रकल्प त्वरित पूर्ण केल्यास पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्‍न त्वरित सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी जोर लावण्याची आवश्‍यकता आहे.

पोलिसांसाठीच्या निवासस्थानाचा आराखडा तयार केला आहे. आता पुढील आदेश आल्यानंतर कामांना सुरवात होणार आहे.
- नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त, सोलापूर

Web Title: solapur news police