नेत्यांचे मनोमिलन; कार्यकर्त्यांचे काय?

संतोष सिरसट
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

सोलापूर - गेल्या दहा वर्षांपासून राज्यात प्राथमिक शिक्षक संघाचे दोन गट कार्यरत आहेत. माजी आमदार शिवाजीराव पाटील व शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात या दोघांच्या गटांनी राज्यात आपापले बस्तान बसविले आहे. अशातच दहा वर्षांनंतर पुन्हा या दोन्ही शिक्षक नेत्यांनी मनोमिलनाचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय प्राथमिक शिक्षक असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पटणार का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात 27 फेब्रुवारीला आदेश काढला आहे. त्या आदेशामुळे एकाच जिल्ह्यातील जवळपास पाच ते सात हजार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.

त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांची गैरसोय होणार आहे. ओरोस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झालेल्या अधिवेशनात पाटील व थोरात या दोघांमुळेच तालुकाबाह्य प्रशासकीय बदल्यांचा आदेश सरकारने रद्द केला होता. तो उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आताही 27 फेब्रुवारीचा बदली आदेश, निवडश्रेणी, जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग यांसारख्या संघटनांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकण्यासाठी मनोमिलन व्हावे, अशी इच्छा आहे.

2007 मध्ये एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या पाटील व थोरात यांनी एक- दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेद्वारे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडणार का, हा खरा प्रश्‍न आहे. प्रत्येक जिल्ह्यात यांचे दोन गट कार्यरत आहेत. दोन्ही नेते एक झाल्यामुळे जिल्हास्तरावरील नेतेमंडळी एक होणार का? येत्या रविवारी (ता. 26) शिक्षक संघाच्या या नेत्यांनी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय महामंडळ सभेचे आयोजन केले आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यात एकच कार्यकारिणी करण्यावर शिक्कामोर्तब होते का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

पैशापुरते एक नको?
दोन्ही गट एक झाल्यानंतर राज्याचे अधिवेशन घेऊन राज्य व जिल्हाभर एकच कार्यकारिणी जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र, या दोघांनीही राज्यापेक्षा अखिल भारतीय स्तरावरचे अधिवेशन गोव्याला घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे त्यांचा नेमका हेतू काय, याबाबत शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अधिवेशनाच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यासाठी एक होऊ नये, अशीच अपेक्षा सर्वसामान्य शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: solapur news politics