राज्यातील शाळांमध्ये आज प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान 

संतोष सिरसट
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सोलापूर - राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये यंदा "प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प' अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त उद्या (मंगळवारी) सकाळी सव्वादहा वाजता प्रदूषणमुक्त दिवाळी कशी साजरी केली जावी, याबाबतची शपथ राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. 

दिवाळीच्या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण केले जाते. याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. याकरिता प्रदूषणमुक्त "दिवाळी संकल्प अभियान शपथ-2017' या उपक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाने केले असून, या अभियानाच्या शपथेचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याचवेळी राज्यभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. 

या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शन व आकाशवाणीवरून केले जाणार असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्तीची शपथ घ्यायची आहे. ज्या शाळांमध्ये परीक्षा सुरू असतील, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना या उपक्रमातून वगळण्यात यावे, अशा सूचनाही प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी केल्या आहेत.

Web Title: solapur news Pollution free Diwali Sankalp Campaign schools