सोलापूर जिल्ह्यात निम्म्या भागात 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

अक्कलकोटला 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी; चार तालुक्‍यांनी ओलांडली शंभरी

अक्कलकोटला 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी; चार तालुक्‍यांनी ओलांडली शंभरी
सोलापूर - जिल्ह्यात यंदाच्या वर्षी सरासरी चांगला पाऊस झाला आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, जिल्ह्यातील चार तालुक्‍यांमध्ये 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अक्कलकोट तालुक्‍यात तर 50 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. याउलट माळशिरस, सांगोला, माढा व बार्शी या तालुक्‍यांनी पावसाच्या सरासरीची शंभरी ओलांडली आहे.

जिल्ह्यात सरासरी 488 मिलिमीटर पाऊस दरवर्षी पडतो. यंदा सप्टेंबरअखेर 415 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याची टक्केवारी सरासरी 85 इतकी आहे. काही तालुक्‍यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त, तर काही तालुक्‍यांत खूपच कमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिना संपल्यामुळे आता भरवशाचा पाऊस संपला असल्याचे बोलले जाते. यापुढील काळात परतीच्या पावसाची हजेरी जिल्ह्यात लागली, तर सरासरी 100 टक्के पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे. यंदा सुरवातीपासून चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांचा पहिला पंधरवडा असा जवळपास अडीच महिने पाऊस जिल्ह्यातून गायब झाला होता. मात्र, पुन्हा सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्‍यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला. त्यामुळे पावसाची सरासरी टक्केवारी 85 इतकी झाली आहे. सप्टेंबर संपल्यानंतर आता पावसाने उघडीप दिली आहे.

यापुढे परतीचा पाऊस होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, खरिपामध्ये वाढलेल्या पेरणीचा टक्का पाहिला तर रब्बीचा जिल्हा ही ओळख हळूहळू पुसण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.

Web Title: solapur news rain