सोलापूरः संततधार पावसाने नवी पेठेतील इमारत कोसळली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

ही जुनी इमारत असून लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेली आहे. बाजूच्या इमारतीही जुन्या पद्धतीच्या असून त्यांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- रामचंद्र पेंटर, सहायक अभियंता, बांधकाम विभाग

एक जखमी; अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले लोकांना बाहेर

सोलापूर: संततधार पावसामुळे नवी पेठेतील एका जुन्या इमारतीची भिंत सोमवारी (ता. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरामध्ये सहाजण अडकले होते, पैकी एक ज्येष्ठ नागरिक किरकोळ जखमी झाला. महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होती.

नवी पेठ परिसरातील राजवाडे चौकात वासुदेव सखाराम औरंगाबादकर यांच्या मालकीची इमारत आहे. ही इमारत जीर्ण झाली आहे. महापालिकेने संबंधित मिळकतदारास धोकादायक इमारतीबाबत नोटीसही बजावली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. त्यामध्ये घनश्‍याम औरंगाबादकर, अन्नपूर्णा औरंगाबादकर, वक्रतुंड औरंगाबादकर, संपदा औरंगाबादकर, प्रणव औरंगाबादकर अडकले होते. त्यांच्याशिवाय श्‍याम औरंगाबादकर हे किरकोळ जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी पाठविण्यात आले.

कोसळलेल्या भिंताचा भाग हलविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भिंत कोसळलेल्या ठिकाणी बॅरिकेड टाकून बोळ बंद करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिसरातील विद्युत सेवा बंद करण्यात अली आहे. महापालिका आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, अग्निशामक दलाचे अधीक्षक केदारनाथ आवटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी औरंगाबादकर कुटुंबीयांना धीर दिला. दरम्यान, महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेवक अमोल शिंदे, अमर पुदाले यांनीही घटनास्थळी भेट देऊन जखमीची विचारपूस केली. प्रभारी नगरअभियंता विजय राठोड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व धोकादायक भागाला बॅरिकेडिंग करण्याची सूचना दिली.

Web Title: solapur news rain and The building collapsed