सोलापुरात शनिवारी सहकार परिषदेचे आयोजन

सोलापुरात शनिवारी सहकार परिषदेचे आयोजन

सहकार भारती आणि सहकार सुगंध यांचा उपक्रम

सोलापूर : सहकार भारती आणि सहकार सुगंध यांच्यावतीने शनिवारी (ता. 3 मार्च) दुपारी तीन वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष अविनाश महागावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याच कार्यक्रमात सहकार सुगंध अहवाल स्पर्धेचे पारितोषिक वितरण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदयराव जोशी, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महाराष्ट्र स्टेट को.ऑप. बॅंक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत. 2017-18 हे सहकार भारतीचे संस्थापक प्रणेते स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्यात सर्वच जिल्ह्यात सहकार परिषदेत आयोजिली जात आहे. सोलापुरातील सहकार परिषदेत अनुभवी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, पुणे विभागीय सहनिबंधक दीपक तावरे, सोलापूर जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, शहर उपनिबंधक कुंदन भोळे हेही उपस्थित राहतील. परिषदेतील तज्ञांच्या मार्गदर्शनानंतर सहकार सुगंध मासिकाच्यावतीने नागरी सहकारी बॅंका व पतसंस्थांच्या वार्षिक अहवाल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल. यंदाच्या वर्षी राज्यातून 250 बॅंका आणि 750 पतसंस्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. देवगिरी, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मुंबई व पश्‍चिम महाराष्ट्र अशा विभागवार एकूण पन्नास संस्थांना यावेळी पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.

या परिषदेच्यानिमित्ताने सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणीची दोन दिवसाची बैठक देखील सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी होणार आहे. या बैठकीस राज्यभरातून सर्व तालुका व जिल्हास्तरावरवरून तीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या पत्रकार परिषदेस स्वागत समितीचे सचिव प्रशांत बडवे, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख अनिल वळसंगकर, सहसंघटन प्रमुख संतोष गायकवाड, सोलापूर जिल्हा सचिव अतुल दीक्षित, शहर संघटक किरण करकमकर, सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com