संजय कोळींना नोटीस बजावण्यावरून महापालिका प्रशासनात निर्माण झाला पेच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सोलापूर - महापालिका सभेदरम्यान महापौर शोभा बनशेट्टी यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेले स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांना नोटीस कोण बजावणार, याबाबत प्रशासनात पेच निर्माण झाला आहे. आयुक्त आणि नगरसचिव याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर - महापालिका सभेदरम्यान महापौर शोभा बनशेट्टी यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेले स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांना नोटीस कोण बजावणार, याबाबत प्रशासनात पेच निर्माण झाला आहे. आयुक्त आणि नगरसचिव याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या मंगळवारी झालेल्या सभेत गाळे भाडेवाढीचा विषय विरोधी पक्षाच्या बाजूने मंजूर करावा लागला. त्यामुळे चिडलेल्या श्री. कोळी यांनी महापौरांना उद्देशून अपशब्द वापरले होते. ते स्पष्टपणे ऐकू गेल्याने महापौरांनी डायसवरूनच श्री. कोळी यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. कायद्यामध्ये जास्तीत जास्त 15 दिवस निलंबनाची आणि समिती सदस्य असेल तर त्याचे कामकाज करण्याची मुभा असल्याची तरतूद आहे. 

सभा संपल्यावर महापौरांनी यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. श्री. कोळी यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा आदेश आयुक्तांना दिला आहे. तसेच कोणाचाही दबाव आला किंवा कुणीही सांगितले तरी हे निलंबन मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. यासंदर्भात सोमवारी प्रशासनाकडून नोटीस काढणे अपेक्षित होते. मात्र नोटीस काढण्याचे नेमके काम कुणाचे, यावरून संबंधितांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे तूर्त तरी श्री. कोळी निलंबनाच्या नोटिशीपासून दूर आहेत. 

अशी आहे कायदेशीर तरतूद 
महापालिका अधिनियमातील कलम 2 (1) व (2) नुसार सभेदरम्यान गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकास तातडीने सभा सोडून जाण्यास सांगता येईल आणि संबंधिताने तसे करणे आवश्‍यक आहे. हाच प्रकार दुसऱ्यांदा झाला तर संबंधितास 15 दिवसांपर्यंत निलंबित करता येईल व त्यास सभेस गैरहजर राहण्यास सांगता येईल. मात्र संबंधित नगरसेवक एखाद्या समितीचा सदस्य असेल तर त्यास समितीच्या कामाकाजापासून रोखता येणार नाही, निलंबनाच्या कालावधीत "तो' नगरसेवक समितीचे कामकाज करू शकेल.

Web Title: solapur news sanjay koli