पहिल्या दिवशी गणवेश दुरापास्तच 

संतोष सिरसट
मंगळवार, 6 जून 2017

सोलापूर - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती व दारिद्य्र रेषेखालील मुलांना शासनाकडून मोफत गणवेश दिला जातो. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व गणवेश देण्याच्या सूचना शासनाच्या असतात. मात्र, यंदाच्या वर्षी राज्यातील जवळपास 50 लाख विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळणे दुरापास्तच होणार आहे. 

अद्यापही पैसेच नाहीत 
सर्व शिक्षा अभियानातून मोफत गणवेश घेण्यासाठी देण्यात येणारे पैसेच अद्यापही राज्यातील एकाही जिल्हा परिषदेला मिळाले नाहीत. शाळा सुरू होण्यासाठी केवळ 10 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तरीही पैसे न मिळाल्याने यंदाच्या वर्षी पहिल्याच दिवशी गणवेश देण्याची चालत आलेली परंपरा खंडित होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पाच डिसेंबर 2016 च्या शासन आदेशान्वये लाभाच्या वस्तू थेट वस्तू स्वरूपात न देता त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतर केवळ यंदाच्या वर्षासाठी बालभारतीने केलेल्या विनंतीमुळे शासनाने मोफत पुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पुस्तकांच्या संदर्भात होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे. मात्र, मोफत गणवेशाच्या संदर्भात शासनाने कडक भूमिका घेतली आहे. मोफत गणवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 400 रुपये दिले जातात. यंदाच्या वर्षीपासून हे पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी संबंधित विद्यार्थी व त्याच्या आईचे संयुक्त खाते राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये उघडण्याचे आदेश यापूर्वीच शासनाने दिले आहेत. मात्र, अद्यापही राज्यातील 25 टक्के विद्यार्थ्यांचीही खाती बॅंकेमध्ये उघडलेली नाहीत. त्यामुळे गणवेशासाठीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर कधी मिळणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

खाते उघडण्यास बॅंकांची टाळाटाळ 
शासनाने विद्यार्थी व त्याच्या आईचे खाते झिरो बॅलन्सने राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, याबाबत बॅंका टाळाटाळ करत आहेत. ग्रामीण भागात बॅंकेमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्याचा परिणामही खाते उघडण्यावर होत आहे.

Web Title: solapur news Sarva Shiksha Abhiyan