साडेअकरा लाख घरांना "सौभाग्य'चा लाभ

संतोष सिरसट
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रधानमंत्री सहज बिजली हर घर'अंतर्गत "सौभाग्य' या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ 25 सप्टेंबरला केला. या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील वीज नसलेल्या 11 लाख 64 हजार घरांपर्यंत वीज पोचविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यासाठी "सौभाग्य' ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

"सौभाग्य'मध्ये शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी दिली जाईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीजजोडणी विनाशुल्क देण्यात दिली जाईल. इतर लाभार्थ्यांना मात्र 500 रुपये शुल्क आकारले जाईल. हे 500 रुपये संबंधित लाभार्थ्याने त्यांच्या बिलातून 10 हप्त्यांत भरायचे आहेत. योजनेत वीजपुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीजबिल भरणे बंधनकारक आहे. मात्र, थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेली घरे, तात्पुरत्या शिबिरामधील स्थलांतरित होऊ शकणारी घरे तसेच शेतामधील घरे या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी दिवा मोफत दिला जाईल. तसेच अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्‍य नाही, अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा केला जाईल. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डी. सी. पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डी. सी. चार्जिंग पॉइंट मोफत देण्यात येईल. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनाही मोफत वीजपुरवठा दिला जाणार आहे.

आकडे बोलतात
वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट - 11 लाख 64 हजार 135 लाभार्थी
पारंपरिक पद्धतीने दिला जाणारा वीजपुरवठा - 7 लाख 67 हजार 939 लाभार्थी.
अपारंपरिक पद्धतीने दिला जाणारा वीजपुरवठा - 21 हजार 56 लाभार्थी.
वीजजोडण्या देण्याचे काम सुरू - 3 लाख 96 हजार 196 लाभार्थी (दारिद्य्ररेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडित दीनदयाळ ग्रामज्योती योजनेतून)

वीजजोडणीसाठी येथे करावा संपर्क
राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी "सौभाग्य' योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. त्याचबरोबर 1800-200-3435 अथवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: solapur news saubhagya home scheme