स्कूल बस, रिक्षा विद्यार्थी वाहतुकीसाठी सज्ज

स्कूल बस, रिक्षा विद्यार्थी वाहतुकीसाठी सज्ज

सोलापूर - येत्या शैक्षणिक वर्षात १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी याची तयारी सुरू केली आहे. तशीच तयारी उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयानेही केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची तपासणी केली आहे. त्यानंतर त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. प्रमाणपत्र नसणाऱ्यांना विद्यार्थी वाहतूक करता येणार नसून कारवाई केली जाणार आहे.

शाळा सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनीही स्कूल बसची आरटीओकडून तपासणी करून घेतली आहे. ज्यामध्ये त्रुटी असतील त्या दूर करून शाळा सुरू होण्याआधी वाहने तयार करण्याची धावपळ सध्या सुरू आहे. स्कूल बसचालक निर्व्यसनी, चांगल्या चारित्र्याचा असल्याची खात्री केली जात आहे. आरटीओच्या नियमावलीनुसार स्कूल बसचा रंग, कंत्राटाशिवाय अन्य कोणतेही कंत्राट असल्यास त्याचा रंग, पायऱ्यांची उंची, बसच्या दोन्ही बाजूला बहिर्वक्र भिंगाचे आरसे, आत मोठा पॅराबॉलिक आरसा, प्रवेश दरवाजाच्या पायऱ्यांसोबत आधारासाठी दांडा, गॅंगवेकडील हॅंडल किंवा आसनाच्या रचनेत हॅंडल्स आहेत का, स्टेपवेल लगतच्या आसनाजवळ स्टॅंचियन पोल, आडवे-उभे दांडे अथवा जाळी वापरून चालक कक्ष प्रवासी कक्षापासून वेगळा केला आहे का, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन उपकरणे, दप्तरे ठेवण्यासाठी रॅक, धोक्‍याचा इशारा देणारी प्रकाशयोजना, दोन दांड्यांमधील अंतर, वेग नियंत्रक बसविला व सील केला आहे का, बसच्या मागे व पुढे शालेय मुलाचे चित्र असलेले स्टिकर/फलक व ‘स्कूल बस’ असे लिहिले का, लॉक यंत्रणा आहे का, आपत्कालीन दरवाजा आदी सर्व बाबींची पूर्तता केली जात आहे.

पालकांनीही जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षात आपल्या पाल्याला बसवू नये. रिक्षाचालकाची पूर्ण माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

जिल्ह्यातील ६५३ रजिस्टर्ड स्कूल बसपैकी ४०० वाहनांची तपासणी केली आहे. नियमावलीनुसार न धावणाऱ्या वाहनांवर १९ जूनपासून आरटीओ व पोलिसांकडून कारवाई केली जाईल. पालकांनीही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जात नाहीत ना याकडे लक्ष द्यावे. 
- बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

आमच्या शाळेच्या एका स्कूल बसची व दोन व्हॅनची आरटीओकडून तपासणी करून घेतली. बसचालक निर्व्यसनी व चांगल्या चारित्र्याचा असल्याची खात्री करून घेतली असून, विद्यार्थिनींच्या बसमध्ये खास महिला कंडक्‍टरची नियुक्ती केली आहे.
- उमा कोटा, प्राचार्या, कुचन प्रशाला व ज्युनिअर कॉलेज

आरटीओच्या नियमावलीनुसार व्हॅन विद्यार्थी वाहतुकीसाठी तयार असून, नियमांचे काटेकोर पालन करणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रथमोपचार पेटी, अग्निशमन कीट, चालक व विद्यार्थ्यांत सुरक्षित जाळी, वेगमर्यादा, अलार्म आदी यंत्रणांनी वाहन सज्ज आहे.
- मोहन मामड्याल, स्कूल व्हॅनचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com