सोलापुरातून संपूर्ण दक्षिण भारताला शालेय गणवेशाचा पुरवठा

श्रीनिवास दुध्याल
बुधवार, 7 जून 2017

कुशल कारागिरी व उत्तम दर्जाचा परिणाम; हजारो हातांना मिळतोय रोजगार

कुशल कारागिरी व उत्तम दर्जाचा परिणाम; हजारो हातांना मिळतोय रोजगार
सोलापूर - सोलापूर शहरातून महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारताला शालेय गणवेशाचा पुरवठा होत असून, यामुळे शहरातील हजारो कारागिरांना रोजगार उपलब्ध होत आहे. आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमारेषेवरील शहर असल्याने, तसेच कुशल कारागिरी व उत्तम दर्जामुळे सोलापूरच्या गणवेशाला मागणी असल्याची माहिती सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे समन्वयक दर्शन कोचर यांनी दिली.

सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाची स्थापना 1970 मध्ये झाली असून, सध्या याचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, उपाध्यक्ष नीलेश ऊर्फ राजू शहा, सचिव राजेंद्र कोचर, सहसचिव अमितकुमार जैन आहेत. पूर्वी थोड्याफार प्रमाणात रेडिमेड उद्योग सुरू असायचा. कालांतराने या उद्योगात अनेकांचा सहभाग वाढत गेला. आज शहरातील पूर्व भागात, तसेच विडी घरकुल, इंदिरानगर आदी भागांत घरगुती रेडिमेडचे 800 ते एक हजार युनिट असून, 50 ते 60 हजार कारागिरांना रोजगार मिळत आहे.

सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, गोवा येथून शालेय गणवेशाची मागणी वाढली आहे. ज्या-त्या राज्यांच्या व शाळांच्या नियमानुसार असलेल्या फर्स्ट-फोर्थ, हाफ पॅंट-हाफ शर्ट, फुल पॅंट-फुल शर्ट, पिनॅको, सलवार-कमीज, ब्लेझर, बी ग्रेड, तसेच इंटरनॅशनल व मोठ्या संस्थांच्या मागणीप्रमाणे उच्च दर्जाच्या कापडापासून बनविलेल्या गणवेशाची ऑर्डरप्रमाणे सोलापुरातून वेळेत पोच आहे. शिलाईच्या उत्तम दर्जामुळे गणवेशाच्या बाबतीत सोलापूरचे नाव संपूर्ण भारतात होत आहे. तसेच इतर अनेक राज्यांतून गणवेशाची मागणी होत असल्याने कुशल कारागिरांचीही आवश्‍यकता भासणार आहे. कुशल कारागिरांची मुबलक उपलब्धता झाल्यास सोलापूरची ओळख जशी चादर उत्पादक शहर म्हणून आहे, ती यापुढे रेडिमेड व्यवसायाच्या नावानेही होईल, यात शंका नाही.

सोलापूर आता "रेडिमेड हब' होत आहे. येथून संपूर्ण दक्षिण भारतात शालेय गणवेश पोचला असून, हा उद्योग आता सोलापुरातील इतर उद्योगांना पर्याय ठरत आहे. गणवेशाचे अनेक प्रकार येथे बनवले जात असल्याने व दर्जा चांगला असल्यानेही गणवेशाच्या बाबतीत सोलापूरचे नाव भारतभर होत आहे. मात्र, कुशल कारागिरांची कमतरता आहे.
- दर्शन कोचर, समन्वयक, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ

Web Title: solapur news school uniform supply by solapur