देशात अराजकतेची चिन्हे - लक्ष्मीकांत देशमुख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

सोलापूर - चित्रपट, साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. आपली भूमिका मांडताना साहित्य तसेच इतर क्षेत्रातील मंडळीसुद्धा चाचपडत आहेत, अशी वेळ आता आली असली तरी ही अघोषित आणीबाणी नाही; मात्र अराजकतेची चिन्हे दिसत आहेत, असे मत 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

सोलापुरातील श्रमिक पत्रकार संघामध्ये आयोजित वार्तालापात पत्रकारांना उत्तर देताना श्री. देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जर अघोषित आणीबाणी असती तर आपण बोलू शकलो नसतो. अजून तरी अशी वेळ आलेली नसली, तरी अराजकतेची चिन्हे दिसत आहेत. अशा वेळी पत्रकार, साहित्यिक यांनी शांत न राहता विवेकाने भूमिका घ्यावी. मला तुमचे मत मान्य नसले तरी तुमचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे वॉल्टेअर यांनी यापूर्वीच सांगितले आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लेखकांनी झगडले पाहिजे.
मराठी भाषा अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी ही फक्त साहित्यिकांची नसून आपणा सर्वांची आहे. आज मराठी वृत्तपत्रांमध्ये साहित्याविषयीचे लिखाण कमी होताना दिसत आहे. वाचक संख्या किंवा टीआरपी वाढविण्यासाठी माध्यमे साहित्याला स्थान देत नाहीत. यासाठी माध्यमांनीही आत्मपरीक्षण करावे. सर्व अपेक्षा फक्त सहित्यिकांकडून करता येणार नाहीत.

मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. याचा मी निषेध करतो. याविषयी शासन गंभीर नाही. इंग्रजी शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घेतल्यास त्याची प्रगती होते, असा भ्रम पसरत आहे. कर्नाटक व इतर राज्यांत विद्यार्थ्यांसाठी कन्नड, मल्याळम या भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत; मात्र आपल्याकडे असे होत नाही. यामुळे मराठी शिकणाऱ्यांचे प्रमाण भविष्यात कमी होईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले
- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा
- मराठी विद्यापीठाची स्थापना करावी
- केंद्र शासनाच्या कार्यालयात मराठी भाषेचा वापर व्हावा
- मराठी भाषा शिकविण्यासाठी ई कोर्सेस सुरू करण्याचा प्रयत्न
- स्वतः अधिकारी असल्याने संमेलन यशस्वी करण्यासाठी होईल मदत

Web Title: solapur news Signs of chaos in the country