वर्गणीच्या रकमेतून दिला जळीतग्रस्तांना मदतीचा हात

परशुराम कोकणे
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

जयंती उत्सवातून अनावश्‍यक खर्च टाळून आम्ही एका कुटुंबाला मदत केली. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अनाथ मुलांच्या जेवणासाठी मदत दिली आहे. या उपक्रमातून एक वेगळे समाधान मिळाले आहे. इतर मंडळांनीही डॉल्बी आणि इतर होणारा खर्च टाळून सामाजिक उपक्रम करावेत.
- तुकाराम चाबुकस्वार, सदस्य, सिद्धेश्‍वर तरुण मंडळ

संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम

सोलापूर : जयंती उत्सवात डॉल्बीचा धिंगाणा, डिजिटल पोस्टर, फटाक्‍यांची आतषबाजी, हार-फेट्यांनी पुढाऱ्यांचे स्वागत हे चित्र आता सार्वत्रिक झाले आहे. काही ठिकाणी वर्गणीच्या पैशातून पार्ट्याही होत आहेत. एकीकडे असे चित्र असताना आकाशवाणी परिसरातील सिद्धेश्‍वर तरुण मंडळ आणि सिद्धहस्त पंचकमिटीच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त आगीच्या घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.

वेणुगोपाल नगरातील चेतन क्षीरसागर यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 26 जानेवारीला आग लागल्याची दुर्घटना घडली होती. घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. याच परिसरातील सिद्धेश्‍वर तरुण मंडळ आणि सिद्धहस्त पंचकमिटीच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त क्षीरसागर कुटुंबाला मदतीचा हात देण्याचे ठरविले. जयंती उत्सवात कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता फक्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून लोकांकडून स्वेच्छेने जमा केलेल्या वर्गणीतून चेतन क्षीरसागर यांच्या कुटुंबाला मदत म्हणून संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. तसेच परिसरातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यही देण्यात आले. मंडळासमोरील दानपेटीत जमा झालेली रक्कम मुळेगाव येथील अनाथाश्रमातील मुलांच्या जेवणाकरिता खर्च करण्यात येणार आहे.

बुधवारी सायंकाळी हा आगळावेगळा कार्यक्रम झाला. या वेळी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल, अशोक लांबतुरे, श्रीकांत डांगे, चेतन गायकवाड, इरण्णा धनशेट्टी, अजय राऊत, अविनाश चाबुकस्वार, इस्माईल हुलसुरे, बाळासाहेब आळसंदे, मधुकर गवळी, रामचंद्र वाघमारे आदी उपस्थित होते. जयंती उत्सवनिमित्त आगळीवेगळी संकल्पना दत्तात्रय सनके, तुकाराम चाबुकस्वार आणि शिवा कांबळे यांनी मांडली. मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी यास पाठिंबा दिला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमोगसिद्ध कांबळे, प्रभू डांबरे, शरणप्पा वाघमारे, प्रकाश कांबळे, विठ्ठल वाघमारे, यल्लाप्पा कांबळे, विठ्ठल चाबुकस्वार, रवी चाबुकस्वार, कल्लप्पा व्हनकई, धर्मण्णा सनके, नागेश देसाई, हनमंतु बिराजदार, वीरेश स्वामी, शंकर शटगार, मल्लू नंदर्गी, बसवराज जमखंडी, विनायक दुदगी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: solapur news social home fire help the family