सोलापूरच्या राजकारणाला हवा सोशल मीडियाची... 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्राच्या कारणावरून दोन नगरसेविकांचे सदस्यत्व अडचणीत आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एका उमेदवाराने या पोस्टचा संदर्भ घेत विजयी उमेदवाराचे सदस्यत्व कोणत्या कागदपत्रामुळे जाईल याचा शोध सुरू केला आहे. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा मुंबईतील उमेदवार विजयी घोषित होत असेल तर त्याच धर्तीवर आपणालाही ती संधी मिळू शकते, असे त्यांना वाटू लागले आहे

सोलापूर - जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मुंबईतील एकाचे नगरसेवक पद रद्द करीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवाराला सर्वोच्च न्यायालयाने विजयी घोषित केल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरली. ती इतकी गाजली की सोलापूर महापालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या उमेदवारांना नगरसेवक पदाचे डोहाळे लागले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी विजयी उमेदवाराच्या शपथपत्रांची माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे. 

बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभाग 62 मधील अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या शिवसेनेचे राजू पेडणेकर यांना विजयी घोषित केले आहे, अशी माहिती शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याची पोस्ट व्हायरल झाली. सोलापुरातील काही राजकीय कार्यकर्त्यांच्या व्हॉट्‌सऍपवर ही पोस्ट आली. त्यांनीही ती शेअर केली. 

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्राच्या कारणावरून दोन नगरसेविकांचे सदस्यत्व अडचणीत आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एका उमेदवाराने या पोस्टचा संदर्भ घेत विजयी उमेदवाराचे सदस्यत्व कोणत्या कागदपत्रामुळे जाईल याचा शोध सुरू केला आहे. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा मुंबईतील उमेदवार विजयी घोषित होत असेल तर त्याच धर्तीवर आपणालाही ती संधी मिळू शकते, असे त्यांना वाटू लागले आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या उमेदवारांकडून हे प्रकार होत आहेतच, त्या शिवाय इतर काही प्रभागातील उमेदवारांनीही कागदपत्रे गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. श्री. ठाकरे यांनी सांगितलेल्या निकालाची प्रत सोलापुरात अद्याप उपलब्ध झालेली नाही. तथापि, त्याच धर्तीवर आपलेही भले होऊ शकेल अशी आशा "डोहाळे'लागलेल्या उमेदवारांना वाटू लागली आहे. 

पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू 
बृहन्मुंबईच्या प्रभाग 62 मधील नगरसेवकांबाबत ही घटना झाली असली तरी राज्य निवडणूक आयोगाने या प्रभागाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. बृहन्मुंबईतील दोन जागांसह पुण्यातील एका जागेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे "नगरसेवक' पदाचे डोहाळे लागलेल्या उमेदवारांचा स्वप्नभंग होण्याचीच जास्त शक्‍यता आहे

Web Title: solapur news: social media