सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम शक्‍य

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

सोलापूरः शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या औज बंधाऱ्यात साडेचार मीटर पाणीसाठा होऊन तो ओव्हरफ्लो झाला आहे. त्याचवेळी चिंचपूर बंधाऱ्यात मात्र फक्त साडेतीन मीटरपर्यंतच बर्गे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात शहराला पाणीपुरवठा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सोलापूरः शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या औज बंधाऱ्यात साडेचार मीटर पाणीसाठा होऊन तो ओव्हरफ्लो झाला आहे. त्याचवेळी चिंचपूर बंधाऱ्यात मात्र फक्त साडेतीन मीटरपर्यंतच बर्गे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात शहराला पाणीपुरवठा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात प्रत्येकी साडेचार मीटरपर्यंत पाणी साठविण्याची क्षमता आहे. ज्यावेळी चिंचपूर बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला असतो, त्यावेळी टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रात उपशासाठी आवश्‍यक असलेला पाणीसाठा असतो. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात कोणती अडचण येत नाही. मात्र, चिंचपूर बंधाऱ्यात आता फक्त साडेतीन मीटरपर्यंतच पाणीसाठा असल्याने त्याचा परिणाम टाकळी येथील पातळीवर होणार आहे. पर्यायाने टाकळीतील पाणी समतोल ठेवण्यासाठी औज बंधाऱ्यातून पाणी सोडावे लागणार आहे.

औजप्रमाणेच चिंचपूर बंधाराही साडेचार मीटरपर्यंत भरून ठेवावा, अशी मागणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र, पावसाळ्यात साडेतीन मीटरपेक्षा जास्त उंचीचे बर्गे टाकता येत नाहीत, असे तांत्रिक कारण देत बर्गे वाढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. प्रशासनाने सध्या तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असले तरी, प्रत्यक्षात त्यानुसार कार्यवाही होण्यास आणखी दोन-तीन दिवस लागणार आहेत. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.

50 ते 55 दिवस पुरणार पाणी
चिंचपूर बंधारा साडेचार मीटर भरला असता तर शहराला 75 दिवस पाणीपुरवठा करणे शक्‍य झाले असते. मात्र, त्या ठिकाणी साडेतीन मीटरपर्यंत पाणी साठविल्याने फक्त 50 ते 55 दिवस पाणीपुरवठा करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे चिंचपूरही बंधारा साडेचार मीटरपर्यंत भरावा यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: solapur news solapur city water