सोलापूरः गल्लोगल्ली झळकणार लखपती थकबाकीदारांची नावे

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

लखपती थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करून ते प्रभागनिहाय गल्लोगल्ली लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही नियोजन करीत आहोत. थकबाकीदाराची नावे वर्तमानपत्रातही प्रसिद्ध केली जाणार आहेत.
- आर. पी. गायकवाड, कर संकलन प्रमुख

महापालिका आयुक्तांचे आदेश; यादी बनविण्याचे काम सुरू

सोलापूरः मिळकत व पाण्याच्या कराची लाखो रुपये थकबाकी असलेल्या मिळकतदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करून ती संबंधित गल्लोगल्ली लावण्यात येणार आहेत. या संदर्भातील आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज (मंगळवार) दिले. त्यानुसार यादी बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ही मोहिम महापालिका राबविणार असल्याबाबतचे वृत्त "सकाळ'ने दिले होते.

महापालिकेच्या शहर व हद्दवाढ भागामधील मिळकतदारांकडे जवळपास 250 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी प्रत्येक वर्षात नियोजन केले जाते. मार्च महिना आला की वसुलीचा जोर वाढतो. कर वसुली तीव्र करण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या.

शहराच्या काही ठराविक पेठा आणि झोपडपट्ट्यांच्या परिसरातील बहुतांश मिळकतदार थकबाकी भरण्यास सहसा तयार होत नाहीत. अनेकदा कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. गावठाण भागातील मिळकतदार पैसे भरण्यास तयार असतात. मात्र, बहुतांश मिळकतदारांकडून नगरसेवकांमार्फत दबाव आणला जातो. त्यामुळे लाख रुपये थकबाकी असली तरी, पाच किंवा दहा हजार रुपयांवर कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागते.

शहराच्या सर्वच भागातील मोठे थकबाकीदार कर्मचाऱ्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे आयुक्तांनीच आता पुढाकार घेऊन नियोजन कले पाहिजे, अशी मागणी होत होती. त्यानुसार आता पालिका प्रशासन तयारीला लागले आहे.

Web Title: solapur news solapur municial the names of the defaulters