कोरम नसलेल्या सभेला दुखवटा प्रस्तावाने तारले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

सोलापूर - कोरम नसेल तर कोणतेही कामकाज न होता कोरमअभावी सभा तहकुबीची घोषणा केली जाते. पण शनिवारी कोरम नसतानाही सभा चालली, दुखवट्याचा प्रस्तावही आला आणि तो मंजूर होऊन सभा तहकूब केली गेली. कोरम नसताना प्रस्ताव मांडण्याची महापालिकेतील ही पहिलीच घटना असावी. 

सोलापूर - कोरम नसेल तर कोणतेही कामकाज न होता कोरमअभावी सभा तहकुबीची घोषणा केली जाते. पण शनिवारी कोरम नसतानाही सभा चालली, दुखवट्याचा प्रस्तावही आला आणि तो मंजूर होऊन सभा तहकूब केली गेली. कोरम नसताना प्रस्ताव मांडण्याची महापालिकेतील ही पहिलीच घटना असावी. 

महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा शनिवारी होती, मात्र ती पुढे ढकलण्याचा निर्णय महापौर निवासात झालेल्या बैठकीत शुक्रवारी सायंकाळी झाला होता. तसे निरोपही नगरसेवकांपर्यंत पोचले होते. त्यामुळे सभा सुरू झाल्यावर महापौर, उपमहापौरांसह १८ जण सभागृहात होते. सभा सुरू करायची तर किमान ३५ सदस्य असणे बंधनकारक असते. इतके सदस्य नसतील तर कोरमअभावी सभा तहकूब, असा निर्णय दिला जातो व कोणताही प्रस्ताव किंवा सूचनाही दाखल करून घेतली जात नाही. मात्र कोरम नसतानाही सभा चालली. महापौर शोभा बनशेट्टी यांनी दुखवट्याचा प्रस्ताव वाचला, सदस्यांनी आदरांजलीही वाहिली आणि सभा तहकूब करण्यात आली. 

यासंदर्भात सभागृहनेते सुरेश पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘सभा कशी चालली, याचे आम्हालाही आश्‍चर्य वाटले. याबाबत विधान सल्लागारांकडून माहिती घेऊ.’’

काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे व बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. याबाबत नगरसचिवांना विचारणा करू, असे ते म्हणाले.

आता प्रतीक्षा सभा सुरू होण्याची
महापालिकेची अंदाजपत्रकीय सभेच्या आतापर्यंत चार ते पाच वेळा तारखा जाहीर झाल्या आणि ऐनवेळी त्या या ना त्या कारणाने रद्द झाल्या. शनिवारची सभा निश्‍चित होणार, याबाबत तयारीही करण्यात आली होती, मात्र आयुक्त नसल्याने तीही सभा पुढे ढकलावी लागली. आता ५ जुलैला सभा होणार आहे, मात्र ती सुरू होऊन स्थायी समितीचे सभापती संजय कोळी अंदाजपत्रक सादर करेपर्यंत काहीच खरे नाही, अशी सद्यःस्थिती आहे.

Web Title: solapur news solapur municipal corporation

टॅग्स