बोंबा मारल्या, गुढी उभारली तरीही पगार नाही

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 21 मार्च 2018

तांत्रिक कारणामुळे अधिभाराची रक्कम जमा होण्यात अडचण निर्माण झाली होती. ती दूर झाली असून, दोन दिवसांत कर्मचाऱ्यांचा पगार निश्‍चित होईल. 
- दत्तात्रय लोंढे, मुख्य लेखापाल, सोलापूर महापालिका 

सोलापूर : होळी निमित्त बोंबा मारल्या... नवीन वर्षाची गुढीही उभारली...तरीही आमच्या घरामध्ये गोडधोड करण्याची संधी मिळालीच नाही... निधी येऊनही पगार का झाला नाही असा संतप्त सवाल  महापालिका कर्मचाऱ्यांतून विचारला जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तर "गुढी'नंतर प्रशासनाच्या नावाने "बोंब' मारली. 

या महिन्याचे जीएसटी अनुदान मिळाले नाही. मात्र मुद्रांक अधिभारापोटी 18 कोटी 60 लाख रुपये सोलापूर महापालिकेस मंजूर झाले. त्यामुळे गुढी पाडव्याच्या आधी पगार होईल, त्यामुळे होळीनंतर "बोंब' मारण्याची वेळ येणार नाही असे पालिकेतील कर्मचाऱ्यांना वाटले. मात्र "जीएसटी' चे अनुदान आणि अधिभाराची रक्कम पालिकेच्या खात्यावर जमा होण्यासाठीची प्रक्रिया वेगवेगळी आहे. जीएसटीचे अनुदान थेट जमा होते, अधिभार मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जमा होतो. परिणामी आजच्या घडीलाही अधिभाराची रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सेवानिवृत्तांची अवस्था भयानक आहे. रोज फेऱ्या मारून हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. आज होईल, उद्या होईल अशी उत्तरे त्यांना मिळत आहेत. प्रशासकीय पातळीवर रक्कम जमा करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम रक्कम जमा होण्यावर झाला आहे. होळी संपली, गुढी पाडवाही झाला आता तरी पगार आणि सेवानिवृत्तीवेतन मिळावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे. 

तांत्रिक कारणामुळे अधिभाराची रक्कम जमा होण्यात अडचण निर्माण झाली होती. ती दूर झाली असून, दोन दिवसांत कर्मचाऱ्यांचा पगार निश्‍चित होईल. 
- दत्तात्रय लोंढे, मुख्य लेखापाल, सोलापूर महापालिका 

Web Title: Solapur news solapur municipal corporation workers salary