शहरातील 65 टक्के रिक्षाचालकांना नियमच माहीत नाहीत!

परशुराम कोकणे
बुधवार, 21 मार्च 2018

बेकारीमुळे वाढतेय सोलापुरात रिक्षांचे प्रमाण

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात वाहतुकीची कोंडी होण्यास नियम माहीत नसणाऱ्या वाहनधारकांसह बेशिस्त रिक्षाचालकही तेवढेच जबाबदार आहेत. रस्त्यावर, चौकात प्रवासी घेण्याच्या नादात रिक्षा थांबविण्याच्या सवयीमुळे वाहतूक व्यवस्था बिघडली आहे. 65 टक्के रिक्षाचालकांना वाहतुकीचे नियमच माहीत नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

बेकारीमुळे वाढतेय सोलापुरात रिक्षांचे प्रमाण

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात वाहतुकीची कोंडी होण्यास नियम माहीत नसणाऱ्या वाहनधारकांसह बेशिस्त रिक्षाचालकही तेवढेच जबाबदार आहेत. रस्त्यावर, चौकात प्रवासी घेण्याच्या नादात रिक्षा थांबविण्याच्या सवयीमुळे वाहतूक व्यवस्था बिघडली आहे. 65 टक्के रिक्षाचालकांना वाहतुकीचे नियमच माहीत नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

वयस्कर रिक्षाचालक शक्‍यतो नियमांचे उल्लंघन करीत नाहीत. कारवाई होण्यापेक्षा नियम पाळलेले बरे असे त्यांचे म्हणणे असते. जर चूक झाली तर दंड भरण्याची त्यांची तयारी असते. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने महापालिकेच्या परवानगीने शहरात 339 रिक्षा थांबे मंजूर करण्यात आले आहेत. पूर्वी सहा हजार रिक्षा होत्या. आता नव्याने तीन हजार रिक्षांची नोंदणी झाली आहे. एक लाख लोकसंख्येला 800 रिक्षा हे सूत्र असावे. याबाबतचा अहवाल हकीम समितीने दिला होता. शहरात काही भागात स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. रिक्षाचालकांमुळे मागच्या गाड्या थांबून राहतात. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यातही पोलिसांचा बराच वेळ जातो.

आकडे बोलतात..
नोंदणीकृत रिक्षा जवळपास ः 10000
शहरातील रिक्षा थांबे ः 339

बेकारीमुळे वाढताहेत रिक्षा
पैसे मिळविण्याचे सर्वांत सोपे साधन म्हणून रिक्षाकडे पाहिले जात आहे. कोणीही उठतोय आणि रिक्षा चालवतोय अशी सोलापूरची स्थिती झाली आहे. यात अनेक महाविद्यालयीन तरुण असल्याचेही समोर आले आहे. शासनाने परमीट ओपन केल्याने रिक्षांची संख्या वाढत आहे. इतर शहरांच्या मानाने सोलापुरात अधिक रिक्षा आहेत, असे उपप्रादेशिक कार्यालयातून सांगण्यात आले.

कुठे चुकताहेत रिक्षाचालक...
- गणवेश वापरत नाहीत.
- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे.
- कोठेही थांबवायचे, प्रवासी घ्यायचे.
- चुकीच्या दिशेने वाहन चालविणे.

स्मार्ट सिटी होत असताना महापालिकेची परिवहन व्यवस्था सक्षम असायला हवी. बस उपलब्ध होत नसल्याने लोक रिक्षाने प्रवास करतात. आरटीओ आणि पोलिस यांच्याकडून रिक्षाचालकांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बहुतांश रिक्षावाल्यांना नियम माहिती आहेत, पण त्यांचे पालन होत नाही. रिक्षावाल्यांनी स्वयंशिस्तीने सुधारणा करायला हवी. रिंगरोड लवकर व्हायला पाहिजे, त्यामुळे शहराच्या वाहतुकीवरील ताण कमी होईल.
- बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

लोकसंख्येच्या मानाने रिक्षांची संख्या वाढली आहे. रिक्षांसाठी नव्याने थांबे मंजूर करून पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. 75 टक्के रिक्षाचालकांकडे रिक्षा चालविण्याचा परवाना नाही. पोलिसांकडे दंड भरून रिक्षा चालविली जाते. 35 टक्के रिक्षाचालकांनाच वाहतुकीचे नियम माहिती आहेत. 80 टक्के रिक्षा परवानाधारक स्वत: रिक्षा चालवीत नाही. रिक्षा चालविण्यासाठी दुसऱ्याला देण्याचे प्रमाण अधिक आहे.
- महिपती पवार, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेल.

Web Title: solapur news solapur rto rikshaw rules