सौरऊर्जेच्या माध्यमातून ‘लक्ष्मी’ची स्मार्ट वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

सोलापूर - सोलापुरातील जुनी बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी सहकारी बॅंकेच्या संचालकांनी बदलत्या ऋतुमानाचा फायदा घेत सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. काटकसरीचा व्यवहार कसा असावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.

सोलापूर - सोलापुरातील जुनी बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी सहकारी बॅंकेच्या संचालकांनी बदलत्या ऋतुमानाचा फायदा घेत सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. काटकसरीचा व्यवहार कसा असावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.

लक्ष्मी सहकारी बॅंक ही सोलापुरातील सौरऊर्जेवर चालणारी पहिली सहकारी बॅंक असणार आहे. सौरऊर्जेच्या वापरामुळे बॅंकेच्या वीजबिलाची सुमारे २० हजारांची बचत होणार आहे. सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश या रूपाने तयार होणाऱ्या ऊर्जेस सौरऊर्जा म्हणतात. ती निसर्गाची देणगी आहे. या नैसर्गिक ऊर्जेचा ग्लोबल वार्मिंगच्या युगात पुरेपूर वापर करणे गरजेचे आहे. संचालक मंडळाने सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यानुसार लक्ष्मी सोलार एजन्सीकडून १५ किलो वॅट क्षमतेची सौरऊर्जेची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यासाठी बॅंकेच्या शेवटच्या मजल्यावर ४८ सोलार पॅनल बसविण्यात आले. ही यंत्रणा बसविण्यासाठी साडेसात लाख रुपयांचा खर्च आला.

बॅंकेच्या मुख्य शाखेत आठ एसी, २० संगणक, २५ पंखे व बल्ब आहेत. ही सर्व उपकरणे आता सौरऊर्जेवर चालतात. पूर्वी बॅंकेला महिन्याला सरासरी २५ हजार रुपये बिल येत होते. ते आता दोन ते तीन हजार रुपयांवर आले आहे. त्यामुळे वीजबिलात तब्बल २२ ते २३ हजार रुपयांची बचत होत आहे. काटकसरीने बॅंक चालविणे हे लक्ष्मी बॅंकेचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या विचारसरणीतूनच सौरऊर्जेचा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

सौरऊर्जेतून आर्थिक बचत होत असल्याने यापुढील काळात बॅंकेच्या अन्य शाखेतही सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन आहे. 
- प्रा. पुरणचंद्र पुंजाल, ज्येष्ठ संचालक

Web Title: solapur news solar energy solapur