सायबर पोलिस ठाण्यांमुळे मिळतेय तपासाला गती 

परशुराम कोकणे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सोलापूर - ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट यासारख्या तक्रारी आल्यानंतर पूर्वी पोलिस गोंधळून जायचे. नेमकी तक्रार काय दाखल करून घ्यायची आणि तपास कसा करायचा, या विचाराने सारेच टाळाटाळ करायचे, पण गेल्या दीड वर्षापूर्वी राज्यभरात सुरू झालेल्या सायबर पोलिस ठाण्यांमुळे चित्रच पालटले.

सोलापूर - ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट यासारख्या तक्रारी आल्यानंतर पूर्वी पोलिस गोंधळून जायचे. नेमकी तक्रार काय दाखल करून घ्यायची आणि तपास कसा करायचा, या विचाराने सारेच टाळाटाळ करायचे, पण गेल्या दीड वर्षापूर्वी राज्यभरात सुरू झालेल्या सायबर पोलिस ठाण्यांमुळे चित्रच पालटले. सायबर गुन्ह्यांची नोंद आणि तपास थेट सायबर पोलिस ठाण्यांमध्ये होऊ लागल्याने तपासाला गती आली आहे. 

सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण पोलिस दलात दीड वर्षापूर्वी स्वतंत्रपणे अद्ययावत अशा सायबर पोलिस ठाण्यांची स्थापना केली आहे. शहराच्या सायबर पोलिस ठाण्याची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक मधुरा भास्कर यांच्याकडे तर ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्यावर आहे.

आकडे बोलतात.. 
शहर सायबर पोलिस ठाणे

  • एटीएमबाबत 43 तक्रारी. 23 तक्रारींचे निरसन 

  • गहाळ मोबाईलच्या 362 तक्रारी. 146 तक्रारींचे निरसन 

  • फेसबुक विषयी 28 तक्रारी. सर्व तक्रारींचे निरसन 

ग्रामीण सायबर पोलिस ठाणे 

  • एटीएमबाबत 7 तक्रारी. 5 तक्रारींचे निरसन 

  • गहाळ मोबाईलच्या 196 तक्रारी. 114 तक्रारींचे निरसन. 

  • फेसबुक, व्हॉट्‌सऍपविषयी 40 तक्रारी. 38 तक्रारींचे निरसन 

प्रशिक्षित टीमच्या नेतृत्वाखाली सायबर गुन्ह्यांचा तपास चालू आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दीड वर्षापूर्वी राज्यभरात 43 सायबर पोलिस ठाणी आणि 51 सायबर लॅब सुरू केले. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण येण्यासाठी नागरिकांनी जागृत होणे आवश्‍यक असल्याने सायबर पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून विविध कार्यशाळांचे आयोजन करून जनजागृती केली जात आहे. इंटरनेट माध्यमाने मानवी जीवन सुलभ झाले आहे, हे जितके खरे तितकेच याच्या वापराबाबतच्या अपुऱ्या माहितीने ते धोक्‍यातही आले आहे.

सायबर गुन्ह्यांच्या तपासाकरिता शासनाकडून पोलिसांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उपलब्ध झाल्याने तपासाला गती आली आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास अद्ययावत पद्धतीने चालू आहे. पूर्वीच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांचा तपास गतीने होत आहे. 
- बाळसिंग रजपूत, 

पोलिस अधीक्षक, सायबर सेल, महाराष्ट्र

सायबर गुन्हेगार याच उणिवांचा फायदा उठवून इतरांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर सुरक्षितरीत्या करणे गरजेचे असल्याचे लोकांना सांगण्यात येत आहे. 
 
याबाबत करता येईल तक्रार 
ऑनलाइन बॅंकिंग, ऑनलाइन खरेदी, मेसेजिंग, ई-गव्हर्नन्स, फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्विटर, व्हिडिओ कॉलिंग या माध्यमातून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत सायबर पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार करता येणार आहे. शहरातील तक्रारींसाठी पोलिस आयुक्तालयातील तिसऱ्या मजल्यावर सायबर पोलिस ठाण्यात संपर्क करता येईल. तर ग्रामीण भागातील तक्रारींसाठी गुरुनानक चौकातील तालुका पोलिस ठाण्याच्या शेजारील ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करता येणार आहे.  

Web Title: Solapur News speed in investigation by cyber police station