एसटी व बसस्थानके होणार आता चकाचक...

राजशेखर चौधरी
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

अक्कलकोट (सोलापूर): एसटी बसेस व स्थानके चकाचक असावीत अशी माफक अपेक्षा बाळगणाऱ्या प्रवाशांना आता एसटीची सर्व बसस्थानके व एसटी चकाचक झालेली दिसतील. २ ऑक्टोबर पासून गांधी जयंतीच्या मुहूर्तावर 'संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा' शुभारंभ करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज (शनिवार) केली.

संत गाडगेबाबांचा आदर्श ठेऊन 'स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे' या मूलभूत संकल्पनेवर आधारित एसटी महामंडळाची सर्व बसेस, बसस्थानके, प्रशासकीय कार्यालये, चालक व वाहक विश्रांतीगृहे व प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यात येणार असून, त्यासाठी महामंडळाच्या वतीने एका बहिस्थ संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ महामंडळाच्या ३१ विभागीय कार्यालयाच्या मुख्यालयात २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संबंधित जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प संपूर्ण राज्यामध्ये यावर्षीच्या अखेरपर्यंत कार्यांवित करण्यात येणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत स्वच्छतेबरोबरच कीड व किटनाशक फवारणी, डास प्रतिबंधक धुराळणी, पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वछता आणि वाळवी व कीड प्रतिबंधक उपाययोजना नियमितपणे केल्या जाणार आहेत. अर्थातच स्वच्छतेबरोबर प्रवाशांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाणार आहे.

या संकल्पनेद्वारे चकाचक बसस्थानक, टापटीप बस, प्रसाधनगृहे प्रवाशांच्या सेवेस सदैव तत्पर असतील, असे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: solapur news ST and bus station will be clean say diwakar raote