शंभर प्रवाशांनी अनुभवला मृत्यूच्या दाढेतला प्रवास

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 19 जून 2017

परिवहन राज्यमंत्र्यांचा प्रतिसाद नाही 
लांब पल्ल्याच्या मार्गासाठी चांगल्या स्थितीतल्या एसटी देणे आवश्‍यक आहे. प्रवासादरम्यान ही बाब लक्षात आल्यावर प्रवाशांच्या सोलापूरचे पालकमंत्री व परिवहन 
राज्यमंत्री विजय देशमुख यांच्याशी रात्री 8 वाजून 47 मिनिटांनी 9822000089 या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सोलापूर - पावसाची रीप रीप... सर्वत्र अंधार पडलेला... घाटाची धोकादायक वळणे आणि त्यातच एसटीची बंद पडलेली हेडलाईन... अशाच स्थितीत तब्बल शंभर प्रवाशांनी मृत्यूच्या दाढेतला प्रवास कसा असतो याचा अनुभव काल रविवारी (ता. 18) घेतला. म्हसवड ते पंढरपूर दरम्यान सुमारे 68 किलोमीटरचा हा प्रवास रात्रीच्या काळ्याकभीन्न अंधारात पूर्णपणे रामभरोसे झाला. त्याला जोड मिळाली एसटी चालकाच्या प्रसंगावधनाची. 

साताराहून सोलापूरकडे निघालेली मेढा डेपोची मेढा ते तुळजापूर (एमएच-14, बीटी- 3079) एसटी म्हसवडला पोचल्यावर रिलेची यंत्रणा अकार्यरत झाली. त्यामुळे हेडलाईट बंद पडली. म्हसवडला डेपो नाही. त्यामुळे एक तर एसटी साताऱ्याला परत नेणे किंवा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणे हे दोन पर्याय चालकांसमोर होते. चालक व वाहकांनी 
गावात जाऊन खासगी कामगारास बोलावून डीमलाईट सुरु राहील याची व्यवस्था करून घेतली. डीमलाईट सुरु झाल्याने एसटी सुरु झाली आणि प्रवासही. 

सोलापूरला कोण जाणार आहे, त्यांना पंढरपूरला एसटी बदलावी लागेल असे वाहकाने सांगितल्यावर प्रवाशांना झाल्या प्रकाराची माहिती झाली. दरम्यान डीम लाईटमध्येच एसटीचा प्रवास सुरु झाला. या लाईटचा उजेड जास्तीत जास्त दहा ते पंधरा मीटरपर्यंतच जात होता. त्यामुळे लांबून येणारे वाहन दुचाकी आहे की चार चाकी हे त्या वाहनाच्या हेडलाईटवरून समजून घ्यावे लागत होते व त्यानुसार या एसटीची गती कमी-जास्त करावी लागत होती. रिलेच्या वायरी थेट जोडल्याने समोरच्या वाहनांना सिग्नलही दाखविणे अशक्‍य झाले होते.

म्हसवड सोडल्यावर पाऊस सुरु झाला. बाहेर चोहोबाजूंनी अंधार, पिलिवचा वळणदार व धोकादायक घाट सुरु झाला. रात्रीच्या प्रवासावेळी एसटीतील लाईट बंद केल्या जातात. मात्र समोरून येणाऱ्या वाहनांना एसटी येत असल्याचे दिसावे म्हणून या एसटीतील दिवे सुरु ठेवले. समोरून येणाऱ्या वाहनाच्या उजेडात या एसटी चालकाने आपले कसब वापरून या धोकादायक घाटातील प्रवास पूर्ण केला. भाळवणीच्या पुढे पथदिवे सुरु असल्याने या एसटीच्या पंढरपूरपर्यंतच्या प्रवासाला अडचण आली नाही. मात्र म्हसवड ते पिलीव घाट उतरेपर्यंत हा मृत्यूच्या दाढेतलाच प्रवास असल्याचा अनुभव प्रवाशांना आला. 

परिवहन राज्यमंत्र्यांचा प्रतिसाद नाही 
लांब पल्ल्याच्या मार्गासाठी चांगल्या स्थितीतल्या एसटी देणे आवश्‍यक आहे. प्रवासादरम्यान ही बाब लक्षात आल्यावर प्रवाशांच्या सोलापूरचे पालकमंत्री व परिवहन 
राज्यमंत्री विजय देशमुख यांच्याशी रात्री 8 वाजून 47 मिनिटांनी 9822000089 या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

विनावाहक वाल्यानेही टोलविले 
मेढा डेपोची एसटी पंढरपूरला पोचल्यावर, त्या ठिकाणी पंढरपूर ते सोलापूर विनावाहक एसटी उभी होती. सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना त्यात बसू देण्याची विनंती मेढा एसटीतील वाहकाने केली, मात्र त्यास प्रतिसाद दिला नाही. विनावाहकमध्ये जवळपास पंधरा सीट रिकामे होते, तर प्रवासी 11 होते. आपत्कालीन स्थितीत तरी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी समजुतदारपणा दाखविला पाहिजे, असे मत यावेळी ज्येष्ठ प्रवाशांनी व्यक्त केले. 

Web Title: Solapur news ST bus accident