'गारमेंट हब'साठी करू सर्वांनी प्रयत्न: सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जानेवारी 2018

श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघातर्फे हॉटेल बालाजी सरोवर प्रिमिअर येथे शनिवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता आयोजित द्वितीय आंतरराष्ट्रीय गणवेश व वस्त्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन वस्त्रोद्योगमंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

सोलापूर : सोलापुरातील चादर व टॉवेल जगात प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सोलापुरात स्वस्तात गणवेश तयार होत असल्याने याचे मार्केटिंग देशातच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायला हवे. येथे टेक्‍स्टाईल पार्क आवश्‍यक असून, मेगा क्‍लस्टरसाठी जागेचा शोध सुरू आहे. वस्त्रोद्योगाला पोषक असे सोलापूर गारमेंट हब होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघातर्फे हॉटेल बालाजी सरोवर प्रिमिअर येथे शनिवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता आयोजित द्वितीय आंतरराष्ट्रीय गणवेश व वस्त्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन वस्त्रोद्योगमंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, अध्यक्ष रामवल्लभ जाजू, उपाध्यक्ष नीलेश शाह, मफतलाल इंडस्ट्रीचे अध्यक्ष ऋषीकेश मफतलाल, विपणन विभागाचे अध्यक्ष एम. बी. रघुनाथ, बॅंक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक अजयकुमार साहू आदी उपस्थित होते. 

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. "श्री सोलापूर'च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सहसचिव अमित जैन यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष श्री. जाजू यांनी सोलापुरातील गारमेंट उद्योगातील प्रगती व अडचणी यांचा आढावा घेतला. 

वस्त्रोद्योगमंत्री श्री. देशमुख पुढे म्हणाले, धूम्रपानविरोधी कायद्यामुळे येथील विडी उद्योग डबघाईला आला आहे. यातील 70 हजार कामगारांना गारमेंट उद्योगात रोजगार मिळवून देऊ. कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र सुरू करू. गारमेंट क्‍लस्टर उभारणीसाठी होटगी येथे जागेचा शोध घेत आहोत. त्याचबरोबर चिंचोळी एमआयडीसी, अक्कलकोट रोड येथेही गारमेंट पार्कसाठी प्रयत्न सुरू आहेत. हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम पार्कसाठी 10 एकर जागा मिळाली आहे. 2022 च्या वस्त्रोद्योग धोरणात विशेष करून गारमेंट उद्योगाला प्राधान्य देणार. 

पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले, सोलापुरातील गिरण्या बंद पडल्यानंतर आता सरकारी धोरणामुळे विडी व यंत्रमाग हे उद्योग अडचणीत आले आहेत. मात्र 1970 पासून छोट्या स्वरूपात सुरू असलेल्या गारमेंट उद्योगाचे मोठ्या उद्योगात रूपांतर होत आहे. या माध्यमातून सोलापुरातून पुन्हा सोन्याचा धूर निघावा, अशी अपेक्षा आहे. 

या वेळी श्री. मफतलाल, श्री. शाह यांनीही विचार व्यक्त केले. बळवंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पवार यांनी आभार मानले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, "श्री सोलापूर'चे सर्व पदाधिकारी, देश-विदेशातील व्यापारी उपस्थित होते. 

Web Title: Solapur news Subhash Deshmukh statement on Garment Hub