तांबडे महाराजांच्या मेसेजचा सोशल मिडीयावर धुमाकूळ

अक्षय गुंड
शनिवार, 27 जानेवारी 2018

महाराष्ट्र जादूटोणविरोधी कायद्यांतर्गत होऊ शकते कारवाई
अंधश्रद्धेचे अफवा पसरवणारे मेसेज फाॅरवर्ड करणार्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ अनुसूची कलम २(१) ख-२  नुसार तथाकथीत चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून फसविल्यास अथवा दहशत पसरविल्यास या कायद्यानुसार  कारवाई करू शकते.

उपळाई बुद्रूक : माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक हे गाव बुध्दीवतांचे गाव म्हणुन संपुर्ण राज्याला परिचीत आहे. या गावातील सुपूत्र देशाच्या कानाकोपर्यांत कार्यरत आहेत. अधिकार्यांचे गाव म्हणुनही या गावाचा नावलौकिक आहे. मात्र  गेली काही दिवसांपासून या उपळाई या गावाबाबत अंधश्रद्धेचा एक मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या गावात 'तांबडे' महाराजांच्या मंदिरात तांबडे महाराजांचा चमत्कार झाल्याच्या मेसेजने व्हाॅट्सअॅपवर धुमाकुळ घातला.

इंटरनेटच्या क्रांतीमुळे प्रत्येक जण सोशल मिडीयाच्या माध्यामातुन एकमेकाला जोडला गेला आहे. एकीकडे नवनवे शोध लावून देश प्रगतीचे शिखर गाठत आहे. मात्र याच समाजातील एक टप्पा आजही अंधश्रध्देने ग्रासला आहे. विशेष म्हणजे, यात सुशिक्षित वर्गही मोठ्या प्रमाणात गुतंला आहे. व्हाॅट्सअॅपच्या अफवामुळे कधी मेलेली माणसे जन्म घेतात तर कधी हयात असणारी माणसे मारली जातात. तसेच कुठे तरी देवांचा चमत्कार होतो असे अनेक अफवांचे मेसेजेस रोज व्हाॅट्सअॅपवर येत असतात. काही दिवसापासुन व्हाॅट्सअॅपवर माढा तालुक्यातील उपळाई या गावात तांबडे महाराजांचा चमत्कार झाला. असा मजुकर असलेला मेसेज २० व्यक्तींना जो पाठवेल त्याची २० दिवसात मनोकामना पुर्ण होईल. 

असा मजकुर असलेल्या मेसेजने सध्या सर्व व्हाॅट्सअॅप ग्रुपवर धुमाकुळ घातला आहे. परंतु सत्य असे आहे की, अश्या कोणत्याही महाराजांचे मंदिर उपळाई मध्ये नाही व कोठेही चमत्कार झालेला नाही. हा अंधश्रद्धेचा भाग असुन काही सुशिक्षीत नागरीकही गंमत म्हणुन हा मेसेज फाॅरवर्ड करत आहेत. एकविसाव्या शतकात सुशिक्षीत नागरीकही मेसेजची खात्री न करता असे मेसेज फाॅरवर्ड करत असल्याने नागरीक शिक्षीत झाले पण सुशिक्षीत कधी होणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

महाराष्ट्र जादूटोणविरोधी कायद्यांतर्गत होऊ शकते कारवाई
अंधश्रद्धेचे अफवा पसरवणारे मेसेज फाॅरवर्ड करणार्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ अनुसूची कलम २(१) ख-२  नुसार तथाकथीत चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून फसविल्यास अथवा दहशत पसरविल्यास या कायद्यानुसार  कारवाई करू शकते.

अशा प्रकारचे फसवे चमत्काराचे मेसेज तयार करून कोणत्याही माध्यमातून प्रसारीत केल्यास जादूटोणा विरोधी कायद्यांर्गत कारवाई होऊ शकते.                     
- प्रा. डाॅ. रमेश शिंदे, सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

सोशल मिडीयावर असे कोणतेही अंधश्रद्धेचे अफवा पसरविणारे मेसेज फाॅरवर्ड करणे कायद्याने गुन्हा आहे. संबधित मेसेजबाबत तक्रार आल्यास गुन्हा दाखल करू. 
- अतुल भोस, सहायक पोलिस निरीक्षक माढा

Web Title: Solapur news Tambde maharaj social media