हमीभावाने तूरखरेदी शेतकऱ्यांच्या मुळावर

संतोष सिरसट
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी 1650, तर सोलापूरची 550 किलो

नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी 1650, तर सोलापूरची 550 किलो
सोलापूर - शासनाच्या वतीने हमीभावाने तुरीची खरेदी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाने "निश्‍चित' केलेली उत्पादकता विचारात घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी एक हजार 650, तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूरची उत्पादकता हेक्‍टरी 550 किलो एवढी दाखविली आहे. तूर खरेदीसाठी उत्पादकतेचा निकष लावणे हे शासनाचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.

तूर हमीभावाने खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या, त्या वेळी हेक्‍टरी साडेबारा क्विंटल इतक्‍या तुरीची हमीभावाने खरेदी करण्याचे आदेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यात मागील दोन-तीन वर्षांपासून कडधान्याचे त्यातल्या त्यात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. उत्पादकता वाढीसाठी शासनाने पैसे खर्च करून प्रयत्न केला.

शासनाच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढीसाठी प्रयत्नही केले. शासनाने सांगितल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेले प्रयत्नच आता त्यांच्या मुळावर येऊ लागल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढीचे प्रयत्न केल्याने एकरी 500 किलो होणारी तूर 700 ते 800 किलोवर गेली आहे. मात्र, उत्पादित केलेली तूरही घेण्यासाठी वेगवेगळी बंधने त्यांच्यावर लादली जाऊ लागली आहेत. प्रत्येक जिल्ह्याची उत्पादकता विचारात घेऊन तूर खरेदी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी तुरीचे जादा उत्पादन घेतले आहे, त्या शेतकऱ्यांच्या सर्वच तुरीची खरेदी हमीभावाने करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. जादा उत्पादन घेतले ही शेतकऱ्यांची चूक झाली का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

हेक्‍टरी एक हजार किलोपेक्षा जादा उत्पादन असलेले जिल्हे
नागपूर-1650, वर्धा, नांदेड-1200, चंद्रपूर, धुळे, नाशिक-1050, लातूर-1000

हेक्‍टरी एक हजारापेक्षा कमी उत्पादन असलेले जिल्हे
यवतमाळ, ठाणे, जळगाव (600), रत्नागिरी, सिंधुदुर्ग (450), गोंदिया, नंदुरबार, नगर, रायगड, बीड (650), पुणे, उस्मानाबाद, अमरावती (700), सोलापूर, औरंगाबाद (550), सातारा, वाशीम, पालघर (500), सांगली, गडचिरोली (350), कोल्हापूर (800), जालना (850), परभणी, हिंगोली, बुलडाणा (750), अकोला (900), भंडारा (300).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news tur purchasing farmer