चांगल्या पावसाने 90 टीएमसी पाणी कर्नाटकात 

संतोष सिरसट
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

सोलापूर शहराला पिण्यासाठी धरणातून तीन ते चार वेळा पाणी सोडावे लागते. एकावेळी जवळपास साडेचार ते पाच टीएमसी पाणी द्यावे लागते. पाच टीएमसी पाणी चार वेळा सोडले तर 20 टीएमसी पाणी सोलापूरला द्यावे लागते. सोलापूरला नदीद्वारे पाणी सोडावे लागत असल्यामुळे धरण "मायनस'मध्ये जात असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. यावेळीही तीच स्थिती निर्माण होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर - सोलापूर व पुणे जिल्ह्यात यंदा जून, सप्टेंबर व ऑक्‍टोबर या महिन्यांमध्ये चांगला पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून जवळपास 80 ते 90 टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. आता धरणात 111 टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या वर्षातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा समितीच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

उजनीला जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. खरीप व रब्बी हंगामासाठी धरणातून पाणी सोडले जाते. एवढेच नाही तर सोलापूर शहरासाठीही पाणी सोडले जाते. त्यानंतर आता "एनटीपीसी' प्रकल्पालाही पाणीपुरवठा केला जात आहे. यंदाच्या वर्षापासून आष्टी, शिरापूर, दहिगाव, बार्शी या उपसा सिंचन योजनांवरील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी झाल्यास त्यांनाही पाणी सोडावे लागणार आहे. त्याचबरोबर सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठीही पाण्याचा उपयोग होतो. कर्नाटकात पाणी जात असताना पुराचे पाण्याने जिल्ह्यातील पाझर तलाव, ओढे, नाले, विहिरी पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आल्या आहेत. 

उजनी धरणामध्ये सध्या एकूण 123 टीएमसी पाणीसाठा आहे. यापैकी उपयुक्त पाणी 59 टीएमसी इतके आहे. धरणातून एक आवर्तन सोडायचे म्हटले तर कालव्यातून जवळपास नऊ ते साडेनऊ टीएमसी, भीमा नदीतून जवळपास साडेचार ते पाच टीएमसी, बोगद्यातून दोन टीएमसी, सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी एक तर उर्वरित शिरापूर, बार्शी, आष्टी, दहिगाव या उपसा सिंचन योजनांसाठी दोन टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे. म्हणजेच एका आवर्तनासाठी जवळपास 20 टीएमसी पाणी द्यावे लागते. याशिवाय धरण क्षेत्रातील पाण्याचा होणारा उपसा वेगळाच आहे. कालवा समितीची या महिन्यात बैठक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्या बैठकीत रब्बीसाठी किती आवर्तने सोडायची याचा निर्णय होईल. त्याचबरोबर सोलापूर शहराला पिण्यासाठी किती वेळा पाणी सोडायचे हेही त्या बैठकीत ठरण्याची शक्‍यता आहे. कालवा, भीमा नदी, बोगदा व सर्व उपसा सिंचन योजनांच्या एका आवर्तनासाठी 20 टीएमसी पाणी लागते. अशी दोन आवर्तने सोडायची झाल्यास 40 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 59 टीएमसी इतका आहे. त्यातील 40 टीएमसी पाणी दोन आवर्तनामध्ये सोडल्यानंतर धरणात 19 टीएमसी पाणी शिल्लक राहते. 

सोलापूरमुळे धरण जाते "मायनस'मध्ये 
सोलापूर शहराला पिण्यासाठी धरणातून तीन ते चार वेळा पाणी सोडावे लागते. एकावेळी जवळपास साडेचार ते पाच टीएमसी पाणी द्यावे लागते. पाच टीएमसी पाणी चार वेळा सोडले तर 20 टीएमसी पाणी सोलापूरला द्यावे लागते. सोलापूरला नदीद्वारे पाणी सोडावे लागत असल्यामुळे धरण "मायनस'मध्ये जात असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. यावेळीही तीच स्थिती निर्माण होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: solapur news: ujani dam