पुरस्कार सोहळा ठरला आनंदाचा उत्सव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सोलापूर -  फेटे बांधलेले शिक्षक, कुतूहलाने पाहणारे त्यांचे कुटुंबीय, आपल्या शिक्षकाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी यामुळे हुतात्मा स्मृती मंदिर परिसराला उत्सवाचे स्वरूप आले होते. ढोल, झांज, लेझीम व पिपाणी यामुळे परिसर गजबजून गेला होता. 

सोलापूर -  फेटे बांधलेले शिक्षक, कुतूहलाने पाहणारे त्यांचे कुटुंबीय, आपल्या शिक्षकाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी यामुळे हुतात्मा स्मृती मंदिर परिसराला उत्सवाचे स्वरूप आले होते. ढोल, झांज, लेझीम व पिपाणी यामुळे परिसर गजबजून गेला होता. 

राज्य पुरस्कार प्रदान कार्यक्रम सुरू होण्याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच सूचनांचेही स्वागत केले. प्रश्‍न, सूचना मांडणाऱ्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर आपण शिक्षणमंत्र्यांनी संवाद केला याचे आनंद दिसत होता. तावडे यांनी परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली. सभागृहाची जागा कमी पडत असल्याने काहींनी उभे राहणेच पसंत केले; तर राज्य शासनाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पाहुण्यांना बसण्याची जागा उपलब्ध करून दिली. 

सभागृहाच्या बाहेर पुस्तकांचे स्टॉल सजले होते. येथून शिक्षकांनी पुस्तकांची खरेदी केली. पाहुण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच बसण्याची मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यांना कार्यक्रम पाहता आला नाही, त्यांच्यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली होती. सभागृहाच्या बाहेर मंगळवेढा येथील अमित भोरकडे यांनी काढलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती. पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी शिक्षकांनी सभागृहाच्या बाहेर जाणे पसंत केले. तेथे आपल्या नातलगांसोबत छायाचित्रे काढून हा दिवस आपल्या स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही विद्यार्थ्यांनी पुरस्कार मिळालेल्या आपल्या शिक्षकांसोबत सेल्फी काढली. नातलगांनी शिक्षकांना पेढे भरून शुभेच्छाही दिल्या.

Web Title: solapur news vinod tawde