तुकाराम महाराज पालखीसाठी सर्जा-राजा आणि माणिक-राजा

मनोज गायकवाड
रविवार, 11 जून 2017

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोड्यांची निवड 

अकलूज : लोहगांव येथील सर्जा-राजा आणि चिंबळी येथील माणिक-राजा ची जोडी यंदा संत तुकाराम महाराजांच्या रथाला जोडली जाणार आहे. श्री क्षेत्र देहू येथील तुकाराम महाराज संस्थानच्या निवड समितीने यावर शिक्कामोर्तब केले आहे. 16 जूनला तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यावेळी सर्जा-राजा आणि माणिक -राजा ही बैलजोडी तुकोबांच्या रथाला जुंपली जाणार आहे. अशी माहिती सोहळा प्रमुख अभिजीत मोरे यांनी सकाळला दिली. 

संत तुकाराम महाराजांचा यंदाचा 332 वा पालखी सोहळा 16 जूनला प्रस्थान ठेवत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने रथाला जोडण्यात येणा-या बैलजोड्यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. तुकोबांच्या रथासाठी बैलजोडीचा सन्मान मिळावा यासाठी पुणे जिल्ह्यातून सतरा आणि सातारा जिल्ह्यातून एक असे अठरा अर्ज संस्थानकडे आले होते. त्यातून दोन बैलजोड्या निवडण्यात आल्या आहेत. यंदा बैलजोडीचा मान लोहगांव (पुणे) येथील भानुदास भगवान खांदवे यांची सर्जा- राजा आणि चिंबळी (ता. खेड) येथील अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक राजा या बैलजोड्यांना मिळाला आहे. लोहगांवचे श्री खांदवे हे गेल्या पाच वर्षापासून या सन्मानासाठी प्रयत्न करीत होते.

त्यांच्या घराला वारकरी परंपरा आहे. 2009 च्या आषाढवारीत त्यांचे वडील भगवानराव यांना पक्षाघात झाला होता. त्यानंतर वडिलांची वारीची परंपरा त्यांनी अखंडीतपणे सुरू ठेवली आहे. प्रगतशील शेतकरी अशी ओळख असलेल्या श्री. खांदवे यांची सर्जा राजाची जोडी सुमारे तीन लाख रूपयांहून अधिक किमतीची असल्याचे सांगितले जात आहे. अप्पासाहेब लोखंडे यांच्याकडे विपुल पशुधन आहे. वारीची परंपरा असलेल्या या कुटंबाने 2013 सालापासून बैलजोडीचा मान मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. यंदा रथाला जोडली जाणारी त्यांची माणिक राजा ही जोडी कर्नाटकातून आणलेली आहे. तीन महिन्यापूर्वी दोन लाख 51 हजार रूपयांना माणिक आणि वर्षापूर्वी दोन लाख 35 हजार रूपयांना राजा हा बैल त्यांनी खरेदी केलेला आहे. 

अशी होते निवड 
संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळा प्रमुख अभिजीत मोरे, सुनिल दिगंबर मोरे, जालिंदर मोरे, विश्‍वस्त सुनिल दामोदर मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे यांचा निवड समितीत समावेश आहे. बैलाचा रूबाबदारपणा, रंग, वशिंड, शिंगे, डोळे, नख्या, चाल शारिरीक ठेवण, आरोग्य आदी बाबींचा विचार करून बैलजोडी निवडली जाते. बैलाचे प्राकृतीक स्वास्थ्य उत्तम असल्याचा पशुवैद्यकीय अधिका-याचा दाखला घेतला जातो. शिवाय बैलाची भार वहनाची क्षमता ही तपासली जाते. त्यानंतरच बैलजोडीची निवड केली जाते. 

माणिक - राजा तब्बेतीने एकदम दांड आहेत. त्यांची तब्बेत मजबूत आहे. 2013 पासून प्रयत्न करीत होतो. यंदा रथाचा मान मिळाला आहे. तीन भावांचे आमचे एकत्र कुटुंब आहे. पालखी रथाचा मान मिळाल्यामुळे कुटंबासह नातेवाईक आणि गावातील लोकांना ही आनंद झाला आहे. 
- अप्पासाहेब लोखंडे

पाच वर्षे प्रयत्न करतोय. यंदा हा सन्मान मिळाला आहे. रथाचा मान मिळाला पाहिजे. यासाठी बैलांची खूप काळजी घेतली आहे. आमच्यासोबत सर्जा राजा ही तुकोबांसोबत पंढरीला येणार आहेत, याचा आनंद आहे. 
- भानुदास खांदवे

Web Title: solapur news wari pandharichi tukaram maharaj palkhi bullocks