जारबाबत सरकार गार!

हर्षल आकुडे
मंगळवार, 30 मे 2017

सोलापूर - लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम व पाणपोईमध्येही तहान भागवण्यासाठी सर्रास थंड पाण्याचे जार मागविले जात आहेत. परंतु, या पाण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जारच्या पाण्याला मागणी मोठी असल्याने व्यवसाय जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे समोर आले आहे. पाण्याचा बाजार मोठ्या प्रमाणात असताना अन्न व औषध प्रशासनाने बोटावर मोजण्याएवढ्या म्हणजे फक्त तीन व्यावसायिकांना नोटिसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे. किती व्यवसायिक आहेत. याचीही आकडेवारी उपलब्ध नाही.

महापालिकेकडून शहरात तीन-चार दिवसाला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जारला नागरिकांसह सरकारी व खासगी कार्यालयांत रोजच्या रोज मागणी आहे. अनेक ठिकाणी पाणपोईंसाठी जार ठेवलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हा व्यवसाय वाढला. ४५० च्या आसपास कोल्ड वॉटर प्लान्टधारक आहेत. चार लाख ग्राहक रोज या पाण्याचा वापर करत असल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या ‘पॅकेज्ड वॉटर’ नियमानुसार ‘कोल्ड वॉटर प्लान्ट’धारकांनी ‘पॅकेजिंग’करून पाणी थंड करावे, असे निर्देश आहेत. 

प्लान्टधारकांच्या म्हणण्यानुसार पॅकेज्ड वॉटर व कोल्ड वॉटर व्यवसाय वेगळा आहे. तर जार व्यवसायासाठी वेगळी व्याख्या तयार करण्याची मागणी केली आहे. याबाबत सोलापूर जिल्हा कोल्ड वॉटर प्लान्ट असोसिएशनने नियमांअंतर्गत घेण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

परवानगी नाही...
५०० रुपये अनामत रक्कम घेऊन २०-३० लिटर पाण्यासाठी २० ते ४० रुपये घेतले जातात. हा व्यवसाय करण्यासाठी सरकारची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. कारण व्यवसाय सुरू करण्यासाठी असलेल्या अटी व नियमांबाबत व्यावसायिक व प्रशासन यांच्यात गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे.

‘कोल्ड वॉटर’च्‍या व्यवसायाला नियम लावण्याबाबतच्या प्रस्तावावर ‘फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड’ने ऑथरिटी दिली नाही. नियमानुसार त्यांना बीआयएसचा पॅकेज्ड वॉटर परवाना घ्यावा लागेल.
- एस. बी. नारागुडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

आम्हाला दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यवसाय करून सरकारला आवश्‍यक असलेली रक्कमही भरण्यास आम्ही तयार आहोत. हे काम बेकायदा नसून त्याला योग्य त्या व्याख्येत बसवून नियम लागू करावेत.
- बनवारीलाल उपाध्ये, अध्यक्ष, कोल्ड वॉटर असोसिएशन

Web Title: solapur news water