पाणपोईत पाण्याबरोबर मिळणार गूळ, साखरही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सोलापूर - येथील भुसार गल्लीतील व्यापाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणपोई सुरू केली असून, यंदा या ठिकाणी शुद्ध, थंड पाणी पथिकास देण्यापूर्वी गूळ, साखर दिली जाते. मग थंड पाणी देऊन त्याची तृष्णा शमवली जात आहे. भर बाजारपेठेत असलेल्या या पाणपोईमध्ये सध्या दिवसाला 22 ते 25 जार पाणी लागत आहे. अशाप्रकारची या परिसरातील ही पहिलीच पाणपोई आहे. या परिसरात मोठ्यामोठ्या व्यापाऱ्यांचा माल उतरविण्यासाठी हमाल मोठ्याप्रमाणात आहेत. ते उन्हात कष्टाचे काम करतात. अशा वेळी त्यांच्या शरीरातील ग्लुकोज कमी होते. तसेच या भागात खरेदीसाठी बाहेरगावाहून ग्राहक येतात. त्यांची खरेदीच्या निमित्ताने खूप पायपीट होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील ग्लुकोज कमी झालेले असते. अशावेळी फक्त पाणी देऊन त्यांची तृष्णा भागविण्यापेक्षा गूळ, साखर असा गोड पदार्थ खायला देऊन नंतर थंड, शुद्ध पाणी पिल्याने त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही. अशी काळजी आम्ही यानिमित्ताने घेत आहोत, असे व्यापारी नंदकुमार भराडिया यांनी सांगितले.

पाणपोईची वैशिष्ट्ये
- रोज सकाळी दहा ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही पाणपोई खुली असते
- स्वच्छतेसाठी पाणपोईत पगारी व्यक्तीची नियुक्ती केली आहे
- पाणी तांब्याच्या सुरईतून ग्लासामध्ये दिले जाते

Web Title: solapur news water jaggery sugar