मराठीतील पहिल्या शिलालेखाची सहस्राब्दी सुरू

रजनीश जोशी
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

अजिंठामधील चित्रांप्रमाणेच या शिलालेखाचेही जतन करावे, ऊन आणि वाऱ्यापासून त्याच्या रक्षणासाठी विशिष्ट काचेची चौकट लावावी. शिलालेखाची झीज डोळ्यांना दिसत नसते. त्यामुळे त्याचे संरक्षण ही जिकिरीची गोष्ट असते.
- आनंद कुंभार, शिलालेख संशोधक

सोलापूर - महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने हत्तरसंग कुडल येथे सापडलेल्या "वाछितो विजेया होईवा' या मराठीतील पहिल्या शिलालेखाचे ब्रीदवाक्‍य करावे, असे मत हा शिलालेख शोधणारे संशोधक आनंद कुंभार यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. या शिलालेखाची सहस्राब्दी नुकतीच सुरू झाली आहे, त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने त्याच्या संरक्षणासाठी विशेष उपाय योजावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा आणि साक्षरतेचे महत्त्व सांगणारा हा शिलालेख श्रवणबेळगोळ येथील "चामुंडराये करविले' या शिलालेखापेक्षाही प्राचीन असल्याचे संशोधक आनंद कुंभार यांनी पुराव्यासह सिद्ध केले आहे. त्याला मान्यताही मिळाली आहे. इ. स. 1018 म्हणजे शके 940 चा हा शिलालेख आहे.

वीज वितरण कंपनीत काम करताना गावोगावी फिरताना शिलालेखाचा अभ्यास करण्याचा छंद जडलेल्या कुंभार यांनी सीना नदीच्या काठी असलेल्या हरिहरेश्‍वर मंदिराच्या तुळईवरील हा शिलालेख शोधला. त्याची सहस्राब्दी सुरू झाली आहे. "जो वाचेल तो विजयी होईल' असा अर्थ असलेल्या या शिलालेखाचे जतन आणि संरक्षण करून तो निरंतर टिकवून ठेवला पाहिजे. या शिलालेखाने साक्षरतेचे महत्त्व पटवले आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने "वाचेल तो वाचेल आणि वाचेल तो टिकेल' असे घोषवाक्‍य केले आहे, त्यापेक्षा या पहिल्या मराठी शिलालेखाचे महत्त्व सांगणारे ब्रीदवाक्‍य भावी पिढ्यांच्या स्मरणात राहू शकेल, असे कुंभार यांनी सांगितले.

शिलालेख वाचनाच्या अभ्यासक्रमाची गरज
धारवाडचे कर्नाटक विद्यापीठ आणि तंजावरच्या तमीळ विद्यापीठातच फक्त शिलालेख वाचनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारा अभ्यासक्रम आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये त्याबाबत मार्गदर्शन केले जाते.

बंगळूरच्या कन्नड साहित्य परिषदेने त्याचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र सरकारनेही शिलालेख वाचनाचा अभ्यासक्रम सुरू केला पाहिजे, अशी अपेक्षा कुंभार यांनी व्यक्त केली.

Web Title: solapur news western maharashtra news marathi Inscription