तुमचे विचारच बनवतील तुम्हाला यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

सोलापूर - माणूस जसा विचार करतो, तसा तो घडत असतो. सकारात्मक विचारांची पेरणीच मानवाला यशस्वी बनवते. परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर स्वार होण्याचा मार्ग स्वीकारा, म्हणजे यश तुमच्यापर्यंत येईल. यश मिळविण्यासाठी योग्य मार्गाने कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे यश स्पर्धा परीक्षेतून मिळणारे असो की व्यवसायातून. यश मिळविताना युवकांनी सामाजिक भान जपणे गरजेचे आहे. सामाजिक भान ठेवून एकत्रितपणे कोणत्याही समस्येला तोंड देणे सोपे होते. स्वतःचा विचार करण्याआधी देशाचा, समाजाचा विचार करायला हवा, असा आत्मविश्‍वास विविध वक्‍त्यांनी दिला.

सोलापूर - माणूस जसा विचार करतो, तसा तो घडत असतो. सकारात्मक विचारांची पेरणीच मानवाला यशस्वी बनवते. परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर स्वार होण्याचा मार्ग स्वीकारा, म्हणजे यश तुमच्यापर्यंत येईल. यश मिळविण्यासाठी योग्य मार्गाने कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे यश स्पर्धा परीक्षेतून मिळणारे असो की व्यवसायातून. यश मिळविताना युवकांनी सामाजिक भान जपणे गरजेचे आहे. सामाजिक भान ठेवून एकत्रितपणे कोणत्याही समस्येला तोंड देणे सोपे होते. स्वतःचा विचार करण्याआधी देशाचा, समाजाचा विचार करायला हवा, असा आत्मविश्‍वास विविध वक्‍त्यांनी दिला.

या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शंकर नवले, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे, ‘यिन’ कम्युनिटी नेटवर्कचे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी आदी उपस्थित होते. डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क व सोलापूर विद्यापीठातर्फे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘समर यूथ समिट’च्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रांतील वक्‍त्यांनी युवकांना नवा आत्मविश्‍वास दिला. दिवसभरातील वैविध्यपूर्ण विषयांवरील मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवे काहीतरी करण्याची ऊर्जा मिळाली. सामाजिक बांधिलकी, गुंतवणूक, ऑनलाइन बॅंकिंग, स्पर्धा परीक्षा आदी विषयांवर विविध वक्‍त्यांनी मार्गदर्शन केले. आनंद मसलखांब यांनी सूत्रसंचालन केले.

यंग इन्स्पिरेटर्स यूथ ॲवॉर्ड विजेते
 आदिनाथ जाधव : सोशल सर्व्हिस कम्युनिटी नेटवर्क
 नंदकुमार गायकवाड : यूथ लीडरशिप
 यज्ञेश बासुतकर : इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजी
 ऋचा फडके : आर्ट्‌स      स्वाती नगरकर : स्पोर्ट्‌स 
 इकरा पीरजादे : कल्चर      नागेश सूत्रावे : एज्युकेशन

भारतीय तरुण हे आधुनिक पद्धतीने राहतात; पण त्यांच्या विचारांत आधुनिकता अजून आलेली नाही. असा परदेशस्थित नागरिकांचा समज आहे. हा समज आपल्याला बदलायचा आहे. यासाठी शिक्षणाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. सामान्यपणे अन्न, वस्त्र, निवारा याकडे आपण मूलभूत गरजा म्हणून पाहतो. यात शिक्षणाचाही अंतर्भाव होतो.
- स्वरूपाराणी मोहिते-पाटील, संचालिका, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज

बॅंका विविध प्रकारची कर्जे देत असतात, शैक्षणिक कर्जसुद्धा यातील एक भाग आहे. शैक्षणिक कर्जाला इतर कर्जांच्या तुलनेने कमी व्याजदर असतो. होम लोन ही बॅंकांकडून पुरवलेली महत्त्वाची सुविधा आहे. १५ वर्षे तुम्ही घेतलेले होम लोन फेडता तेही सारख्याच दराने, पण या काळात तुमच्या घराची किंमत वाढलेली असते. याचा फायदा तुम्हाला होतो.
- दीपक रावल,  वरिष्ठ व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया

इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र यासारखे विषय आपण शाळेमध्ये शिकलेलो असतो. याचा वापर स्पर्धा परीक्षेमध्ये आपणाला करायचा आहे. स्पर्धा परीक्षेचा पेपर तुम्ही घरी बसून चार ते पाच तासांत सोडवू शकता. मात्र तो दिलेल्या वेळेत सोडविणे महत्त्वाचे आहे. या परीक्षेतून तुमची निर्णयक्षमता तपासली जाते. समस्येचे आकलन तुम्ही कोणत्या पद्धतीने करता, हे यातून पाहिले जाते.
- सुनील पाटील,  संचालक, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी 

अब्दुल कलामांनी सांगितल्याप्रमाणे बंद डोळ्यांनी स्वप्न न पाहता उघड्या डोळ्यांनी पहावीत व ती पूर्ण करावीत. आपण अपयश मिळाल्यास एखादी गोष्ट लगेच सोडून देतो. असे न करता मेहनत करून ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जायला हवे. सकारात्मक ॲटिट्यूड ठेवल्यास यशाला गवसणी घालता येते.
- मार्शल दास,  संचालक, ग्रेस ॲकॅडमी

संपूर्ण तयारीनेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षांना सामोरे जा. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतात. अभ्यासात सातत्य ठेवल्यास क्‍लास न लावताही पास होऊ शकतो. सुरवातीला शाळेत शिक्षक म्हणून काम केले. एक वर्ष कठोर परिश्रम घेतल्यानंतर आधी विक्रीकर निरीक्षक आणि नंतर पोलिस उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारली. 
- सोनाली कदम, पोलिस उपअधीक्षक (निवड झालेले)

जे क्षेत्र असेल त्यात उत्तम करण्याचा प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल. अपयश आले तरी खचून न जाता लगेचच पुढचे प्रयत्न करण्यास सुरवात करा. सुरवातीच्या अपयशानंतर १८ तास अभ्यास केल्यानंतर हे यश मिळाले. मिळालेला जॉब अभ्यासासाठी सोडला होता. आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास केला.  
- सचिन कदम,  पोलिस उपअधीक्षक (निवड झालेले)

Web Title: solapur news yin youth