पालकमंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक अन्‌ महेश कोठेंवर निशाणा

तात्या लांडगे
Sunday, 6 October 2019

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कॉंग्रेस- राष्ट्रवादीला सभापतिपदाची संधी असतानाही भाजपचे नेते तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची सभापतिपदी वर्णी लागली.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कॉंग्रेस- राष्ट्रवादीला सभापतिपदाची संधी असतानाही भाजपचे नेते तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची सभापतिपदी वर्णी लागली. त्यामुळे माने यांच्यावर खूश झालेल्या पालकमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांना शहर मध्यमध्ये मदत करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या माध्यमातून महेश कोठे यांना बाजूला सारुन दिलीप माने यांना शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्यात पालकमंत्र्यांचाच हात असल्याची चर्चा आता सुरु आहे.

बाजार समिती निवडणूक की दक्षिण सोलापूरची विधानसभा निवडणूक असो अथवा बाजार समितीतील अनियमितता असो यामध्ये सहकारमंत्री अन्‌ दिलीप माने यांचा विरोध ठरलेलाच. तर दुसरीकडे शहर- जिल्ह्यात सहकारमंत्री विरुध्द पालकमंत्री गटबाजीची चर्चाही मागील पाच वर्षांपासून सातत्याने सुरुच.होती. दरम्यान, दिलीप माने यांनी पालकमंत्री आपले जुने मित्र असल्याचे सांगत दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांवर पालकमंत्र्यांशी जवळीकता साधली. तर आपल्याशिवाय पक्षातील अन्य नेता मोठा होऊ नये व त्याचे मुख्यमंत्र्यांच्या दरबारी वजन वाढू नये याचे नियोजन करुन पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात समविचारी गट स्थापन करण्यात पुढाकार घेतला. त्यातही विरोधी पक्षातील दिलीप माने यांच्याशी जवळीकता ठेवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत पक्षाचे आमदार वाढावेत या उद्देशाने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिलीप माने यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून लढावे आणि त्यासाठी आपण मदत करु असे आश्‍वासन देऊन सहकारमंत्र्यांच्या मार्गातील अडसर दूर केल्याचीही चर्चा आहे.

तत्पूर्वी, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढायचीच या हेतूने महेश कोठे यांनी मागील पाच वर्षांपासून नियोजन केले. मात्र, संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्याशी संपर्क करुन पालकमंत्र्यांनी कोठे यांना उमेदवारी मिळू नये, असा यशस्वी प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे.

महेश कोठे आज घेणार निर्णय

शिवसेनेचे प्रामाणिक काम करताना महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळवले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्याला एबी फॉर्म दिला. मात्र, संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी तो पळवला. दरम्यान, आपण कोणतीही अपेक्षा न करता शिवसेनेत आल्याचे ठासून सांगणाऱ्या दिलीप माने यांनीही तो एबी फॉर्म घेतला. त्यामुळे महेश कोठे यांनी बंडखोरी करत शहर मध्य व शहर उत्तर या दोन्ही मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र, पक्षप्रमुखांनी बंडखोरांना थंड करण्याचा इशारा दिल्याने महेश कोठे काय निर्णय घेणार, याची उत्सुकता असून त्यावर उद्या (सोमवारी) फैसला होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Political news Maharashtra Vidhan Sabha 2019