पक्षनिष्ठेच्या ‘अस्मिते’वर शिवसैनिकांची फुंकर..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सोलापूर - शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हासंघटिका पदाचा राजीनामा दिलेल्या अस्मिता गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक १२ ब मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाकडे मागणी करूनही जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी तिकीट नाकारल्याने निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या पक्षनिष्ठेच्या अस्मितेवर शिवसैनिकांनी फुंकर घातल्याचे दिसत आहे.

येथील शिवसैनिकांच्या दाव्यानुसार गेल्या २२ वर्षांपासून अस्मिता गायकवाड या शिवसेनेचे काम करीत आहेत. प्रभाग क्रमांक १२ च्या परिसरात त्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी कार्य केले आहे. अनेक कार्यकर्त्यांना पतसंस्था, बॅंकेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. परंतु त्यांना तिकीट नाकारल्याने अस्मिता गायकवाड यांनी परिसरातील शिवसैनिकांना एकत्र करून बंडाचे निशाण फडकाविले आहे. शिवसेनेने उमेदवारी देऊ केलेल्या नम्रता निंबाळकर यांचा एबी फॉर्म अर्ज तांत्रिक बाबींमुळे नामंजूर झाल्याचा प्रकार अस्मिता गायकवाड यांच्या पथ्यावर पडला आहे.

शिवसेनेचे सोलापूरचे पहिले जिल्हाप्रमुख बाबूराव वडणे यांच्या हस्ते पाठिंब्याचे पत्र अस्मिता गायकवाड यांना देऊन आम्हीच खरे निष्ठावंत, असा दावा काही शिवसैनिकांनी केला आहे. या पत्रावर २२ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. तर अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहावे लागले तरी शिवसेना पुरस्कृत उमेदवार नम्रता निंबाळकर या असल्यामुळे आम्हीच अधिकृत आणि आम्हीच निष्ठावंत असा दावा त्यांच्याकडून होणार आहे.

शिवसैनिक विरुद्ध निष्ठावंत शिवसैनिक
या प्रभागात शिवसैनिक विरुद्ध निष्ठावंत शिवसैनिक अशी लढाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु जनतेच्यादृष्टीने शिवसैनिक कोण आणि निष्ठावंत शिवसैनिक कोण याचे उत्तर २३ फेब्रुवारी रोजी निकालाच्या दिवशीच कळणार आहे.

Web Title: solapur prabhag 12 shiv sena