सोलापूरचे रेल्वे स्थानक होतेय स्मार्ट! 

परशुराम कोकणे
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

सोलापूर : भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाच्या वतीने सोलापूर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे. प्रवेशद्वाराचे रुपडे पालटले असून प्लॅटफॉर्मची उंचीही वाढविण्यात येत आहे. 

सोलापूर : भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाच्या वतीने सोलापूर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे. प्रवेशद्वाराचे रुपडे पालटले असून प्लॅटफॉर्मची उंचीही वाढविण्यात येत आहे. 

भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाच्या वतीने देशभरातील 70 स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. यात मध्य रेल्वेतील सहा स्थानकांचा विकास केला जात असून यात सोलापूरसह पुणे, नागपूर, मुंबई, बुऱ्हाणपूर, लोणावळा आदींचा समावेश केला आहे. सरकते जिने, लिफ्ट, ट्रॅक ऍपरन यांच्यासह स्थानकाच्या इमारतीचे विस्तारीकरण, वेटिंग रूम, रिटायरिंग रूमची संख्या वाढविणे, वॉटर एटीएम व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. प्रवेशद्वारासमोरील इंजिन बाजूला घेऊन ते आडवे लावण्यात येणार आहे. इंजिन परिसरात बगीचाही करण्यात येणार आहे. 

- प्रवेशद्वारासमोर आकर्षक पोर्च 
- वाहन पार्किंगसाठी व्यवस्था 
- रिक्षा थांबविण्यासाठी रकाने 
- प्रवेशद्वारासमोर बागबगीचा 

रेल्वे स्थानक सुशोभीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. नव्या वर्षात मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता असून प्रवाशांना नवा लुक आवडेल. प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्येही वाढ होणार आहे. 
- हितेंद्र मल्होत्रा, मंडल रेल्वे प्रबंधक 

रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरणामुळे स्मार्ट लूक आला आहे. प्रशासनाकडून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न दिसून येतोय. प्रवाशांनी हा परिसर स्वच्छ ठेवावा. रिक्षाचालकांनीही शिस्तीचे पालन करावे. 
- शंतनु कुलकर्णी, प्रवासी 

रेल्वे स्थानक परिसरातील सुशोभीकरणामुळे स्मार्ट सोलापूर वाटत आहे. नव्या बदलामध्ये रिक्षा थांबविण्यासाठी स्थानकाच्या उजव्या बाजूला जागा देण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. 
- सुभाष वाघमोडे, रिक्षाचालक

Web Title: Solapur Railway station will become smart