शुद्ध इंधनाबरोबरच विषमुक्त अन्नधान्य पुरवठा

अभय दिवाणजी
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळावी तसेच महिला सक्षमीकरणासाठी कम्युनिटी पोलिसींग म्हणून ऍग्री मॉल उभारण्यात आले आहे. यातून जनसामान्यांशी नाळ जोडण्याचा एक वेगळा प्रयोग केलेला आहे.
- विरेश प्रभू, जिल्हा पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पॅटर्न; जादूई पेटीचीही योजना

सोलापूर: पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. पेट्रोल पंपाद्वारे शुद्ध इंधनाबरोबरच विषमुक्त अन्नधान्य पुरवठ्याची योजना सुरू केली आहे. या योजनेबरोबरच जादूई पेटीचीही एक वेगळी कल्पना आखली आहे. या आगळावेगळ्या उपक्रमाने महिला, शेतकरी व ग्राहकांच्या माध्यमातून जनमानसाशी नाळ जोडली जात आहे. मार्केटींग व्यवस्था मार्गी लागली तर या उपक्रमाचा "सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पॅटर्न' राज्यभर जाईल.

सरकारने पोलिसांसाठी विविध पेट्रोलियम कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून (सीएसआर) पेट्रोल पंप मंजूर केले. या माध्यमातून मिळालेले उत्पन्न पोलिस कल्याण निधीसाठी जमा करण्यात येते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी यामध्ये कल्पना लढविली. शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा, महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटींग व्हावे यासाठी पेट्रोल पंपाजवळील जागेत ऍग्री मॉल उभा त्यात सेंद्रीय पद्धतीने पिकविलेली ज्वारी, गहू ही अन्नधान्ये, कडधान्ये, लाकडी घाण्याचे तेल, देशी गाईचे तूप, दूध, महिला बचत गटाची उत्पादने, गुलाब जल, फळे विक्रीसाठी ठेवलेली आहेत.

जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून विषमुक्त शेती, शाश्‍वत शेती प्रचार-प्रसारासाठी आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांसाठी प्रबोधन यात्रा काढली जाते. याबरोबरच जिल्ह्यात सेंद्रीय पद्धतीने पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयोग केला. या शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला माल या मॉलमध्ये आणण्याची योजना आखली. तसा प्रस्ताव भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी संवादातून मंजूर करुन घेतला. त्यांच्याकडूनच एक हजार स्क्वेअर फुट जागेवर मॉलची उभारणी केली. पायाभूत सुविधा, अंतर्गत सजावट करून घेतली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनेंतर्गत भाजीपाला केंद्र सुरु केले. शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटाला एकत्रित आणून हे मॉल चालविण्यास दिले. यामुळे महिला, शेतकरी आणि ग्राहक यांच्या माध्यमातून पोलिसांचा जनसामान्यांशी आपोआपच नाळ जोडली जावू लागली आहे.

न्यूट्रीशियन ऍग्री एक्‍स्प्रेस व मॅजिक बॉक्‍स
पोलिसांनी सुरू केलेल्या ऍग्री मॉलवर जे ग्राहक येऊ शकत नाहीत अथवा ज्यांना घरपोच सेवा हवी आहे, अशांसाठी या मॉलमध्ये न्यूट्रीशिअन मॅजिक बॉक्‍सची (निरामय आरोग्यासाठी जादूई पेटी) कल्पना सुरू करण्यात येत आहे. ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे एका पेटीतून सर्व माल घरपोच देण्यात येईल. स्वस्तिक फाऊंडेशन या संस्थेने घरपोच सेवेसाठी घेतलेल्या वाहनातून ही सेवा दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर योजनेचे सादरीकरण करण्यात आले. त्यांना ही योजना आवडली. त्यांनी गोदरेज संस्थेबरोबर बैठक घेऊन बास्केट पॅटर्न मॅनेजमेंट सिस्टीमबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: solapur rural police force pattern food supply