Vidhan Sabha 2019 : सावंतांशी वाकडे अन्‌ उमेदवारीसाठी 'मातोश्री'ला साकडे!

Vidhan Sabha 2019 : सावंतांशी वाकडे अन्‌ उमेदवारीसाठी 'मातोश्री'ला साकडे!

सोलापूर : शिवसेनेचे आमदार ते जलसंपदामंत्री पदापर्यंत अल्पावधीत मजल मारलेल्या तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क वाढविला आहे. मात्र, आमदार नारायण पाटील, जिल्हाप्रमुख महेश कोठे, माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील, नागनाथ क्षीरसागर यांचे सावंतांशी म्हणावे तितके जमत नाही. त्यामुळे आता या इच्छुकांनी थेट 'मातोश्री'लाच साकडे घालायला सुरवात केल्याची चर्चा आहे.

काँग्रेसमध्ये असतानाही आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले नसल्याने आता शिवसेनेतून आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या महेश कोठे यांच्या उमेदवारीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांचा अडथळा आहे. तर दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आपल्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचा विश्‍वास बाळगणाऱ्या अमर पाटील यांच्या मार्गात जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा अडसर आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसनेत प्रवेश केलेल्या रश्‍मी बागल यांच्यामुळे करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी धोक्‍यात असल्याची चर्चा आहे.

युती न झाल्यास शिवसेनेकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल आणि आपले आमदारकीचे कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण होईल, असे स्वप्न पाहणाऱ्या नागनाथ क्षीरसागर यांना मनोज शेजवालसह अन्य इच्छुकांचा अडसर असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे या शिवसेना इच्छुक उमेदवारांचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्याशी फारसे जमत नसल्याची चर्चा आहे. कोठे यांना उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी सोलापुरातील 18 नगरसेवकांनी थेट मुंबई गाठली. मात्र, 50 आमदारांची जबाबदारी घेतलेल्या सावंत यांनी सुचवलेल्या इच्छुकांना
उमेदवारी मिळणार की स्थानिक जुन्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीला पक्षप्रमुख प्राधान्य देणार, याची उत्सुकता लागली आहे.

महेश कोठे विधानसभा लढविणारच

मागील महापालिका निवडणुकीत महेश कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघात इतिहास घडविला. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी ताकद लावूनही शिवसेनेला भरघोस यश मिळाले. या मतदारसंघातून कोठे यांना विजयाची खात्री आहे. मात्र, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यास कोठे निश्‍चितपणे अन्य पक्षातून अथवा बंडखोरी करुन निवडणूक लढवतील, अशीही चर्चा आहे. मतदारसंघातील जनता अन्‌ नगरसेवकांनी त्यांना पाठबळ दिल्याने कोठे यांचा आत्मविश्‍वास बळावल्याचेही दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com